नाना पटोलेवर कारवाईची मागणी
मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देवू शकतो असे वक्तव्य केल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडाऱ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजपचे नेते आक्रमक झाले आहे. पटोले यांच्या या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी आज भाजपच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले. पटोले यांच्या अटकेसाठी भाजपने अनेक पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. तर पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्याकरिता मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज राजभवन येथे जाऊन भेट घेतली. त्यावेळी लोढा यांनी सांगितले की, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले असून मुंबई भाजपा यांचा तीव्र निषेध करत आहे. मोदी देशातील पंतप्रधानांबद्दल काँग्रेस समर्थकांच्या मानात एवढा द्वेष आहे की, देशाचे पंतप्रधान मोदी यांना जीवे
मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. हे पंजाब घटनेवरून सिध्द झाले असून ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. पटोले यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे मंगल लोढा यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, उत्तर पूर्व मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष अशोक राय, मुंबई भाजपा प्रवक्ता निरंजन शेट्टी उपस्थित होते.
चौकट
ते बडबडे व्यक्ती आहेत. त्यांना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची नाही. बौद्धिक उंची असती तर त्यांच्या बोलण्याला उत्तर दिलं असतं. केवळ शारीरिक उंची असणाऱ्या व्यक्तीला थोडीच उत्तर दिलं जातं.
देवेंद्र फडणवीस,
विरोधी पक्षनेते
चौकट
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,”
नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री
चौकट
या प्रकरणाबाबत नाना पटोले यांचे स्पष्टीकरण
“जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
0 Comments