सिद्धू यांच्या मंत्रीपदासाठी पाकिस्थानातून लॉबिंग!


माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा गौप्यस्फोट
 


नवी दिल्ली : 'नवज्योत सिद्धू यांना पंजाबच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी लॉबिंग केले. थेट पाकिस्तानातून त्यांच्यासाठी शिफारस करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या निकटवर्तींयांचे सिद्धू यांच्यासाठी मला फोन आले. त्यांनी मेसेजही पाठवले. याचे सर्व डीटेल्स माझ्याकडे उपलब्ध आहेत,' असा दावा करत माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी खळबळ उडवून दिली.
'काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पाकिस्तानातून येत असलेले फोनकॉल आणि मेसेज याबाबत मी माहिती दिली होती. माझ्याकडचे मेसेज मी त्यांना फॉरवर्डही केले होते. त्यावर सोनिया गांधी यांच्याकडून कोणताही रिप्लाय आला नाही मात्र, प्रियांका यांनी रिप्लाय दिला होता. असे मेसेज करायला लावणारी व्यक्ती मुर्ख आहे, असे त्यांनी नमूद केले होते,' असा दावाही अमरिंदर यांनी केला. 'नवज्योत सिद्धू यांना मंत्रिमंडळात एकदा स्थान द्या. जर त्यांनी मंत्रिपदावर असताना काही गडबड केली तर मग तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नका', अशाप्रकारचा मेसेज मला पाकिस्तानातून आला होता, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पंजाब निवडणुकीसाठी भाजप, अमरिंदर यांचा पंजाब लोक काँग्रेस आणि सुदेवसिंह ढिंडसा यांच्या संयुक्त अकाली दल या पक्षांची आघाडी झाली आहे. आज ठरलेल्या जागावाटपाच्या सूत्रानुसार भाजप ६५, अमरिंदर यांचा पक्ष ३७ तर संयुक्त अकाली दल १७ जागा लढणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या