पेगासस'वरून नवा धमाका; राहुल यांचा मोदींवर सर्वात गंभीर आरोप

 


पेगासस हेरगिरी प्रकरण पुन्हा एकदा तापलं आहे. पेगासस डील प्रकरणी न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या रिपोर्टवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यावर राहुल गांधी यांचा गंभीर आरोप.

पेगासस डील झाल्याचा न्यूयॉर्क टाइम्सचा दावा.

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर साधला निशाणा.

मोदी सरकारने केलेली हेरगिरी हा देशद्रोह: राहुल

नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे रण तापू लागले असतानाच पेगासस डीलबाबत न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या रिपोर्टने मोठा धमाका केला आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या असून या संपूर्ण प्रकरणात पीएमओने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीच करण्यात आली आहे.

पेगासस डीलबाबत न्यूयॉर्क टाइम्सने शुक्रवारी एक वृत्त प्रसिद्ध करत मोठा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै २०१७ मध्ये इस्रायल दौऱ्यावर गेले होते तेव्हा इस्रायलसोबत २ अब्ज डॉलरचे संरक्षण विषयक डील झाले होते. त्यात मिसाइल सीस्टम व्यतिरिक्त इस्रायली कंपनी एनएसओने बनवलेल्या पेगासस स्पायवेअर याचाही समावेश होता, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या शोध अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यावरच बोट ठेवत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह श्रीनिवास बी. व्ही. शक्तीसिंह गोहिल, कार्ती चिदंबरम यांनी ट्वीटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार आणि नेत्यांची हेरगिरी करण्यासाठी मोदी सरकारने करदात्यांचे ३०० कोटी रुपये खर्ची घातले हे न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टने सिद्ध झाले आहे, असे नमूद करत या नेत्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर मागितले आहे.


वाचा : सिद्धू की चन्नी, पंजाबमध्ये काँग्रेसचा पदाचा चेहरा कोण? राहुल गांधी म्हणाले...


मोदी सरकारने देशद्रोह केला: राहुल गांधी


राहुल गांधी यांनी या रिपोर्टवर बोट ठेवत मोदी सरकारवर तोफ डागली. 'मोदी सरकारने हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली. यात राजकीय नेते, सामान्य नागरिक, लोकशाहीचा आधार असलेल्या संस्था या सर्वांचीच हेरगिरी करण्यात आली. फोन टॅप करून सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लष्कर, न्यायपालिका यांना लक्ष्य करण्यात आलं. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे', असा आरोप राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केला आहे. तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी 'चौकीदारच हेर आहे हे आता सिद्ध झाले आहे. बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण भटकत होते तेव्हा, लाठ्यांचा मार खात होते तेव्हा आपले पंतप्रधान पेगासस खरेदी करण्यात आणि हेरगिरीची आखणी करण्यात मग्न होते. हे सर्व लक्षत ठेवलं जाईल', अशा शब्दांत निशाणा साधला. कार्ती चिदंबरम यांनी याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या