“मोदी सरकारला भीती वाटते म्हणून…”; ‘पेगॅसस’वरुन चीन, पाकचा उल्लेख करत शिवसेनेचा हल्लाबोल


“मोदींच्या मनात आले म्हणून त्यांनी अमर जवान ज्योत हटवली. त्यांच्या मनात आले म्हणून ऐतिहासिक संसद भवन बंद करून नवीन संसद उभारली.”

शिवसेनेनं मोदी सरकारच्या कारभारावर साधला निशाणा

इस्रायलशी झालेल्या शस्त्रात्र खरेदी करारामध्ये ‘पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञान खरेदीचाही समावेश असल्याच्या ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तातील दाव्यामुळे नवा वाद उफाळला आहे. अशातच आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून, ‘पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाच्या खरेदीवरून दोन्ही सभागृहांमधील कामकाज पुन्हा वादळी ठरण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन सुरु होण्याच्या आधीच भाजपाच्या प्रमुखविरोधी पक्षांपैकी एक असणाऱ्या शिवसेनेनं भाजपावर ‘पेगॅसस’वरुन हल्लाबोल केलाय. चीन, पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांविरोधात ‘पेगॅसस’ वापरण्याऐवजी मोदी सरकारने ते स्वत:च्या नागरिकांविरोधात वापरल्याचं सांगत शिवसेनेनं केंद्र सरकार आणि भाजपावर निशाणा साधलाय.


भाजपाकडून अपेक्षित प्रतिक्रिया आली…

“ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे एका किरकोळ प्रकरणात खोटे बोलले, त्याबद्दल त्यांना पोलीस चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. आपला देश सोडताना इंग्रज आपल्याला स्वातंत्र्य आणि लोकशाही भेट म्हणून देऊन गेले, हे अलीकडच्या घटनांवरून खरे वाटत नाही. खोटे बोलून लोकशाहीत स्वतःला कसे वाचवायचे हे इंग्रजांनी एकेकाळी त्यांच्याच गुलाम भारताकडून शिकायला हवे. मोदी सरकारने सन २०१७ मध्ये इस्रायलकडून स्पायवेअर पेगॅसस विकत घेतल्याचा दावा ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या प्रख्यात अमेरिकन दैनिकाने केल्यावर भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षित प्रतिक्रिया समोर आली आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

सगळ्या मंडळींची नावेच समोर आली, पण…

“‘न्यूयॉर्क टाईम्स’ म्हणजे सुपारीबाज मीडिया असल्याचे जनरल व्ही. के. सिंग यांनी जाहीर केले आहे. जे सत्य सांगतील किंवा मोदी सरकारच्या चुका दाखवतील ते एकतर देशद्रोही आहेत किंवा सुपारीबाज आहेत. पेगॅसस प्रकरणात पोलखोल केल्यामुळे भाजपवाल्यांनी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला सुपारीबाज ठरवून टाकले आहे. पेगॅसस स्पायवेअर हे हेरगिरी करणारे तंत्र आपण विकत घेतले नसल्याची थाप दोन-चार महिन्यांपूर्वी मोदी सरकारने मारली होती. पेगॅससद्वारे विरोधी पक्षांचे प्रमुख नेते, उद्योगपती, पत्रकार यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. काही लष्करी अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश होता. या सगळ्या मंडळींची नावेच समोर आली, पण तेव्हाही ‘‘विरोधी पक्ष खोटं बोलत आहे, विरोधी पक्ष देशद्रोही आहे’’, असे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले,” असं शिवसेनेनं म्हटलंय.


मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड

“भारतातील काही वृत्तपत्रांनी याबाबत शोध पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करताच त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली, तर या विषयाच्या खोलाशी जाऊ पाहणाऱ्या पत्रकारांना व त्यांच्या मालकांना धमकावण्यात आले. पेगॅसस विषयात काम करणाऱ्या काही बाणेदार पत्रकारांना नोकरीस मुकावे लागले. हे आपल्याकडचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण आता अगदी जोरकसपणे ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे,” असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या ‘ वॉटरगेटचे बाप’ या मथळ्याखालील अग्रलेखातून लगावला आहे.


पेगॅसस हे उदाहरण आहे

“भारताने २०१७ मध्ये इस्रायलकडून प्रक्षेपणास्त्र प्रणाली आणि शस्त्रास्त्रे विकत घेतली. संरक्षण दलासाठी हा मोठा व्यवहार होता, पण हा व्यवहार करताना दोन अब्ज डॉलरच्या सौद्यात स्पायवेअर पेगॅसस ‘केंद्रस्थानी’ होतं. पेगॅसस विकत घेणार असाल तर इतर सौदे करू असे तेव्हा सांगण्यात आले. मोदी सरकारने पेगॅसस स्पायवेअर साधारण पंधरा ते वीस हजार कोटी रुपयांना घेतले. हा जनतेच्या करातून आलेला पैसा होता, पण त्यातून पेगॅसस खरेदी केले. हे पेगॅसस चीन, पाकिस्तानातील अतिरेक्यांवर वापरले नाही, तर मोदी सरकारातील तीन केंद्रीय मंत्री, विरोधी तसेच स्वपक्षाचे नेते, सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर वापरले. त्यांचे मोबाईल फोन, कॉम्प्युटर हॅक करून पेगॅससचा वापर करायचा हे तंत्र आहे. मोदी सरकार किती बेबंदपणे आणि मनमानी पद्धतीने वागत आहे याचे पेगॅसस हे उदाहरण आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.


लोकशाहीचा हा विनाश आहे

आता मोदी सरकारला भीती वाटते म्हणून ते आपल्याच लोकांवर जनतेच्या पैशांनी हेरगिरी करीत आहेत, असा टोलाही शिवसेनेनं लागावलाय. “आपल्याच देशातील प्रतिष्ठत नागरिकांवर पाळत ठेवून त्यांना शत्रूसारखे वागवायचे ही कोणती रीत? लोकशाहीचे हे अपहरण आहे. मोदींच्या मनात आले म्हणून त्यांनी अमर जवान ज्योत हटवली. त्यांच्या मनात आले म्हणून ऐतिहासिक संसद भवन बंद करून नवीन संसद उभारली. त्यांच्या मनात आले म्हणून सार्वजनिक उपक्रम, विमानतळे विकून टाकली. आता त्यांना भीती वाटते म्हणून ते आपल्याच लोकांवर जनतेच्या पैशांनी हेरगिरी करीत आहेत. लोकशाहीचा हा विनाश आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.


मोदी संसदेत आणि सर्वोच्च न्यायालयातही खोटे बोलले आहेत

“एकतर पेगॅससप्रकरणी मोदींचे सरकार संसदेत धादांत खोटे बोलले आहे. संयुक्त संसदीय चौकशीची मागणीदेखील त्यावेळी सरकारतर्फे फेटाळण्यात आली. ती झाली असती तर ‘न्यूयॉर्क टाईम्स’पेक्षा मोठे धक्के दिले गेले असते. अमेरिकेच्या ‘एफबीआय’ या तपास यंत्रणेने पेगॅससची खरेदी केली व देशांतर्गत पाळत ठेवण्यासाठी ते वापरले. त्यांचेही भांडे फुटले तेव्हा त्यांनी पेगॅससचा गैरवापर थांबवला. इतर अनेक देशांतही पेगॅससचा वापर झाला, पण त्या देशांत लोकशाहीचे नामोनिशाण नाही. भारताततही लोकशाही, संसद, सर्वोच्च न्यायालय गुंडाळून ठेवले आहे काय? तसे एकदाचे मोदी सरकारने जाहीर करावे. कारण पेगॅसस प्रकरणात मोदी संसदेत आणि सर्वोच्च न्यायालयातही खोटे बोलले आहेत,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.


पेगॅसस हेरगिरी प्रकरण वॉटरगेटचे बाप

“जनतेच्या पैशांनी हेरगिरी करणारी बेकायदेशीर यंत्रे-तंत्रे खरेदी करायची आणि त्यांचा वापर विरोधकांच्या विरोधात करायचा हा देशद्रोह आहे, देशाशी आणि जनतेशी विश्वासघात आहे. चीनची पीपल्स आर्मी लडाखमध्ये भारताच्या हद्दीत घुसते, त्याची माहिती मोदी सरकारचे पेगॅसस घेत नाही. पाकिस्तान कश्मिरात अतिरेकी कारवाया करते, त्या घुसखोरीवर पेगॅससची पाळत नाही. देश लुटून पळून जाणाऱ्यांवर पेगॅससची निगराणी नाही, पण देशहितासाठी बोलणारे, लिहिणारे मोदींच्या पेगॅसस अस्त्राचे शिकार झाले आहेत. भारतातील मीडियाची मुस्कटदाबी केली तरी जगाच्या पाठीवर आजही वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा झेंडा फडकत आहे. तो भारतातील अतिश्रीमंत राजकीय पक्षाला व त्याच श्रीमंतीतून विकत घेतलेल्या सत्तेला खाली उतरवता येणार नाही. संसदेचे महत्त्व ऐतिहासिक आहे व सर्वोच्च न्यायालयातही एखादा रामशास्त्री उभा राहील व तुमच्या पापांचा पाढा तो वाचल्याशिवाय राहणार नाही. वॉटरगेट प्रकरणात अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांना जावे लागले. पेगॅसस हेरगिरी प्रकरण वॉटरगेटचे बाप आहे. सत्याचा विजय नक्कीच होईल!,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या