नीरा भीमा कारखान्यास व्हीएसआयचा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार जाहीर


इंदापूर : 

        शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास मांजरी बुद्रुक येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) चा गळीत हंगाम सन २०२०-२१ चा मध्य विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार रविवारी ( दि. २) जाहीर करण्यात आला. तसेच कारखान्याच्या दोन शेतकऱ्यांना ऊस भूषण पुरस्कार व अधिकारी कल्याण गायकवाड यांनाही उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. नीरा-भीमा कारखान्याशी संबंधित ४ पुरस्कार जाहीर झाल्याने  कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी दिली. दरम्यान कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या पुरस्काराबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने सदर पुरस्कारांची सोमवारी घोषणा केली. नीरा-भीमा कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक पॅरामिटर मुळे मध्य विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी आनंदराव नामदेव बोंद्रे (रा.निमसाखर),आबासाहेब तुळशीराम घोडके (पिंपरी बु.) यांना ऊस भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच कारखान्याचे पर्यावरण अधिकारी कल्याण गायकवाड यांना उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या कौतुकास्पद कामगिरीबद्दल कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. नीरा-भीमा कारखान्याला यापूर्वी राज्य व देशपातळीवरील एकूण ११ पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहितीही याप्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी दिली. यावेळी संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या