करोनाबाबत आरोग्यमंत्र्यांचा दिलासा! आकडेवारी देऊन म्हणाले, “तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू…”


करोनाच्या नव्या व्हेरिएंटविषयी चिंतेचं वातावरण पसरलं असून त्याविषयी राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

राजेश टोपे यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

ओमायक्रॉन आणि त्यासोबत आलेली करोनाची तिसरी लाट सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय ठरली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नव्याने निर्बंध देखील लागू करण्यात आले होते. मात्र, आता एकीकडे बाधितांची संख्या कमी होऊ लागलेली असल्यामुळे निर्बंध पुन्हा शिथिल करण्याची मागणी होऊ लागली असताना दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोनाबाबत राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी माहिती देताना त्यांनी बाधितांची आकडेवारी आणि टक्केवारी देखील सांगितली आहे.

“तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू येऊन गेला आहे असं म्हणता येईल. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी अचानक बाधितांची संख्या वाढत होती. ती आता तशी नाही. पण राज्याच्या इतर भागात त्याची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही वाढत आहे. पण सर्वजण ५ ते ७ दिवसांच्या उपचारांवर बरे होत आहेत. त्यामुळे इतर भागात वाढणारी बाधितांची सख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.

सोलापूर स्थानकात ट्रेन थांबली अन् तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या; मदतीला धावून आले वर्दीतील चार देवदूत

९२ ते ९५ टक्के बेड अजूनही रिक्त!

दरम्यान, राज्यात करोनासाठी तयार करण्यात आलेले ९२ ते ९५ टक्के बेड अद्याप रिक्त असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. “फक्त ५ ते ७ टक्केच बेडवर रुग्ण आहेत. आयसीयू, ऑक्सिजनवरचे रुग्ण फारतर एक टक्के आहेत. बहुतेक बाधित होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे टास्क फोर्सने मार्गदर्शन करावं, जे निर्बंध आपण लावले आहेत ते किती दिवस ठेवायचे याविषयी मार्गदर्शन मिळालं, तर त्याविषयी लोकांना दिलासा मिळू शकेल”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.


नवा व्हेरिएंट किती धोकादायक?

सध्या ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची चर्चा सुरू झाली आहे. त्याविषयी देखील राजेश टोपे यांनी भूमिका मांडली आहे. “एका नवीन व्हेरिएंटची चर्चा सुरू झाली आहे. तो फार घातक आहे असं मी ऐकलं आहे. जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे. विशेष म्हणजे त्यात मृत्यूदर ३० टक्के आहे असं सांगितलं गेलं आहे. तो सध्याच्या ओमायक्रॉनइतकाच वेगाने प्रसार होणारा आहे. वटवाघुळापासूनच याची सुरुवात झाल्याचं सांगितलं जात आहे. पण अद्याप यावर जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत आहे. त्याचे कोणतेही बाधित नव्याने कुठे आढळलेले नाहीत. त्यामुळे अद्याप त्यावर काळजी करण्याची आवश्यकता नाही”, असं देखील टोपे यांनी नमूद केलं.


मास्कमुक्त महाराष्ट्र असं कधीच म्हटलं नाही!

दरम्यान, मास्कमुक्त महाराष्ट्र करण्याविषयी आपण कधीच उल्लेख केला नसल्याचं राजेश टोपे म्हणाले. “मास्कमुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हटलेलो नाही. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड अशा युरोपातल्या देशांमध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यातून काही बोध घेता येईल का? आपल्याकडील नियमांबाबत काही बदल करता येतील का? याविषयी आयसीएमआरकडे विचारणा करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली”, असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या