युतीमध्ये २५ वर्ष सडलो म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले, “बाळासाहेबांनी सडत ठेवलं…”‘


भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का?; फडणवीसांची विचारणा


मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधत काळजीवाहू विरोधक पूर्वी मित्र होते ही खंत आहे कारण आपणच त्यांना पोसले. आपली २५ वर्षे युतीमध्ये सडली. यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे अशी टीका केली. दरम्यान त्यांच्या या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणात पहायला मिळाल्या. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण २०१२ पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा विचार आमच्या मनात येत आहे,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“पण जे निवडक विसरण्याची पद्धत आहे त्यासाठी आठवण करुन देतो की तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. १९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढले होते,” अशी आठवण यावेळी फडणवीसांनी करुन दिली.

“हे भाजपासोबत सडले असं सांगातत. पण भाजपासोबत असताना पहिल्या क्रमांकाचे आणि सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाले. त्यामुळे कोणासोबत सडले याचाही निर्णय घेतला पाहिजे,” असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला.

“मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येत भाषणात तेच मुद्दे आहेत. आता शिवसैनिकांनाही ते काय बोलणार आहेत हे पाठ झालं असेल. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, रामजन्मभूमीसाठी आम्हीच तिथे होतो सांगतात.. कोण होतं तुमचं?; रामजन्मभूमी आंदोलनात लाठ्या, काठ्या आणि गोळ्या खाणारे आम्ही आहोत. रामजन्मभूमी, बाबरी हे विषय सोडून द्या. ते तर मोदींनी करुन दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात मंदिर उभं राहत आहे. पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा, श्रीमलंगडाचा प्रश्न नाही सोडवू शकले. कशाला राजनन्मभूमीच्या गप्पा मारता. भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय?,” असा सवाल फडणवीसांनी यावेळी विचारला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या