पदभरती परीक्षांसाठीच्या कंपन्यांचे पॅनेल स्थगित करण्याचा निर्णय

पुणे, प्रतिनिधी-पदभरती परीक्षांसाठीच्या कंपन्यांचे पॅनेल स्थगित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. येत्या काळात होणाऱ्या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्याकडून घेण्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे सामान्य प्रशासन विभागाकडून दिले जातील.


सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय मंगळवारी प्रसिद्ध केला. शासकीय पदांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी पाच खासगी कंपन्यांची निवड करण्यात आली होती. मात्र या कंपन्यांकडून घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे सातत्याने आढळून आले. आरोग्य भरती, टीईटी परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांबाबत पोलिसांनी काहींना अटकही केली आहे. त्यामुळे निवडलेल्या कंपन्यांचे पॅनेल स्थगित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. तसेच टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्याकडून परीक्षा घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

विविध विभागांसाठी परीक्षा पद्धती निश्चित करणे, अटी, शर्ती, कार्यपद्धती निश्चित करणे या बाबी सामान्य प्रशासन विभागाशी निगडित असल्याने संबंधित विभागांना सामान्य प्रशासन विभागाशी सल्लामसलत करून त्यांच्या गरजेनुसार सदर बाबी अंतिम करता येतील. या पूर्वी २०१७ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत नसलेल्या पदांची भरती ओएमआर पद्धतीने करण्यात येत होती. तसेच या पदभरतीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, परीक्षेचे निकाल, शिफारस झालेल्या किंवा न झालेल्या उमेदवारांच्या याद्या संकेतस्थळावर जाहीर करणे, परीक्षा शुल्क आदी सामान्य प्रशासन विभागाने निश्चित केले आहे. त्यात काही सुधारणा करायच्या असल्यास सामान्य प्रशासन विभागाकडून निर्णय घेण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या