मुंबई वगळता शाळा सुरू करणार


'मेस्टा' संघटनेशी संलग्नित इंग्लिश स्कूल चालकांचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील मेस्टा या संघटनेशी संलग्न असलेल्या मुंबई वगळता राज्यातील शाळा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय मेस्टा संघटनेशी संलग्नित इंग्लिश स्कूल संस्थाचालकांनी घेतला आहे.
या शाळांमध्ये पालकांचे संमती पत्र घेऊनच शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन ( मेस्टा) चे अध्यक्ष संजय तायडे यांनी दिली.

महाराष्ट्रात मेस्टा संघटनेशी संलग्न 18 हजार शाळा आहेत. त्यातील अनेक शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत तयारी दर्शवली आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रातील मेस्टा या संघटनेशी संलग्न असलेल्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावी आणि शहरी भागातील मुंबई वगळता इतर ठिकाणी आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याची मेस्टा या संघटनेने तयारी दर्शवली आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून राज्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील शिक्षकांसह अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सरसकट शाळा बंद करू नये, अशी मागणी केली होती. परंतु, सरकारकडून या संदर्भात अद्याप विचार केला जात आहे. मेस्टा या संघटनेशी संलग्न असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रशासनाची मान्यता नसताना या शाळा नेमक्या कशा सुरू करणार? हा सुद्धा प्रश्न आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 15 फेब्रुवारी पर्यंत दहावी आणि बारावी सोडून इतर सर्व वर्गाच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

राज्यात आजही 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात 41 हजार 327 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात 40368 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णाची संख्या 68,00,900 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3% एवढे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या