भिशीत १२ कोटींचा घोटाळा ; १६ जणांवर गुन्हा दाखल


इंदापूर :
भिशीच्या नावाखाली ५ कोटी ८८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांवर गुरुवारी (दि.२०)  इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेचे शहराध्यक्ष मेजर महादेव सोमवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नव्याने ११  जणांविरोधात ६ कोटी ५४ लाख १८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामुळे एकूण १६ जणांवर १२ कोटी ४२ लाख १८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने इंदापूर शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे शहराध्यक्ष महादेव सोमवंशी यांच्या फिर्यादी वरुन गोविंद रामदास जाधव, महादेव दशरथ हराळे, राजू वसंत शेवाळे, धनंजय भागवत कांबळे, अजय शिवाजी शेवाळे, गणेश शिवाजी शेवाळे, सचिन लक्ष्मण कुंभार, काशिनाथ एकनाथ म्हेत्रे, संजय चंद्रकांत गानबोटे, संतोष बाबुराव झिंगाडे व प्रशांत सुरेश कुमार या अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता भिशीतून आर्थिक फसवणूक केलेल्या रकमेचा आकडा १२ कोटींहून अधिकचा झाला आहे.  सोमवंशी यांच्या फिर्यादीनुसार सन २०१४-१५  ते २०२२  पर्यंत अकरा जणांनी मिळून बेकायदेशीरपणे २१  जणांकडून भिशीच्या माध्यमातून पैसे गोळा केले व भिशी धारकांची ६ कोटी ५४ लाख १८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. इंदापूर शहरात भिशीमध्ये पैसे गुंतवलेल्या सामान्य मजूरांपासून ते व्यावसायिकापर्यंतच्या शेकडो जणांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर येऊ लागले आहे.  शिवसेनेने यामध्ये लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. हा घोटाळा ३० कोटीपर्यंतचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शहरांमध्ये याहूनअधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असण्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी गुरुवारी संदीप पाटील यांनी फिर्याद दिली होती त्यानंतर सोमवंशी यांनी फिर्याद दिली आहे. त्यामुळे आणखी भिशीचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवारी (दि.१८) पोलिस ठाण्यात फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिस निरिक्षक तयुब मुजावर यांची त्याचप्रमाणे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची भेट घेऊन तक्रारी अर्ज दिला होता त्यावरून चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी गांभीर्याने याची दखल घेत तपास चालू केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या