महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी रयत क्रांतीच्या जिल्हाध्यक्षसह शेतकऱ्यांवर गुन्हा!

पाटस  :


दौंड तालुक्यातील कानगाव येथे विज महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भानुदास शिंदे यांच्यास पाच जणांवर यवत पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव जमविणे, शिवीगाळ, मारहाण व सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार,पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.


 सोमवारी (दि.१७) कानगाव येथे शेतीपंपाचे विजबिल थकल्याच्या कारणावरुन विजजोड तोडण्यासाठी गेलेल्या महावितरण वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांकडून मारहाणीचा घटना घडली. या प्रकरणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष  भानुदास शिंदे,  आबा उर्फ संतोष फडके , गोटु खळदकर ,माऊली शेळके, चौधरी डायरेक्टर (पुर्ण  नाव समजु शकले नाही)  यांच्यासह इतर अनओळखी असे व्यक्तींवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

याबाबत महावितरण वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता हरीदास मोरे यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.  वीज महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांच्या आदेशान्वये कनिष्ठ अभियंता हरीदास मोरे, संतोष बनसोडे, सुनिल ढवळे, अनिकेत शेलार व सागर जाधव हे अधिकारी व कर्मचारी कानगाव येथे शेतीपंपाचे विजबिल थकलेच्या कारणावरुन विजजोड तोडण्यासाठी गेले. त्यांनी एका रोहीत्रावरील विजजोड मधील एक वायरही तोडली. त्यावेळी तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी येऊन विजजोड तोडण्यास मज्जाव केला.संबधीत विज कर्मचाऱ्यांनी याबाबत विज वितरण विभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता रणजीत चांदगुडे यांना याबाबत माहीती कळवली. त्यानंतर चांदगुडे हे पाटस पोलिस चौकीमधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी घेवुन आले. वीज कंपनीचे कर्मचारी हे शेती पंपाचा विजपुरवठा खंडीत करण्यासाठी एका रोहीत्राकडे गेले. त्यावेळी आबा फडके, भानुदास शिंदे, माऊली शेळके, चौधरी, गोटू खळदकर यांच्या सह अनोळखी लोकांनी तुम्ही आमची विजजोड तोडु शकत नाही. तोडलेली पुन्हा जोडुन द्या अशी मागणी करत त्यांच्या अंगावर धावुन गेले. आणि मारहाण केली अशी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून दौंड तालुक्यात कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या प्रश्रांवरुन महावितरण वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात वाद सुरू आहे. सोमवारी या वादाचे पडसाद मारामारीत उमटले.सोमवारी दुपारी पोलीसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने कानगाव येथील विठ्ठल मंदिरात शेतकरी आणि ग्रामस्थांनी धरणे आंदोलन सुरू केले होते रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. तर यवत पोलीस ठाण्यात शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट, अनिल चव्हाण,भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष गणेश आखाडे आदींसह शेतकऱ्यांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू असलेल्याचे समजताच यवत पोलीस ठाण्यातच शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले.तर
 महावितरण वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याचे समजताच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या