पुणे : पुण्यातील जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सकडून ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरील लस विकसित करण्यात येत आहे. 'एमआरएनए' या तंत्रावर आधारित या लसीची मानवी चाचणी लवकरच सुरू होणार आहे.
त्यामध्ये या लसीची परिणामकारकता आणि प्रतिकारक क्षमतेच्या बाबतीत चाचणी होणार आहे. त्यानंतर ती लस बाजारात येणार आहे.
सध्या कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. सध्या आढळणार्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत, तर याआधीच्या लसी या कोरोनाचा मूळ विषाणू आणि डेल्टा व त्याच्या उपप्रकारावर प्रभावी आहेत. मात्र, अडीच महिन्यांपूर्वी ओमायक्रॉन स्ट्रेन आला आणि त्याची संसर्ग क्षमता भयानक असल्याने आता हेच रुग्ण जास्त आहेत. हा स्ट्रेन डेल्टाच्या तुलनेत कमी घातक असला, तरी संसर्ग क्षमता जास्त असल्याने त्यावर लस तयार करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पुण्यातील जिनोव्हा फार्मास्युटिकल कंपनी प्रयत्न करीत आहे.
जिनोव्हा कंपनी ही कोरोनाच्या डेल्टा विषाणूवर प्रभावी असलेली दोन डोसची 'एमआरएनए' या तंत्रावर आधारित लस विकसित करीत आहे. या लसीचा तिसर्या टप्प्यातील चाचणीदेखील सुरू आहे. या कंपनीने याआधी या लसीची दुसर्या टप्प्यातील चाचणी तीन हजार स्वयंसेवकांवर पूर्ण करून तिचा डेटा केंद्राकडे सादर केला आहे. तर लवकरच तिसर्या टप्प्यातील चाचणीही सुरू आहे. त्यांना एकदा केंद्राकडून परवानगी मिळाल्यावर ती लस कंपनी बाजारात आणार आहे. तसेच कंपनीने या लसीचे उत्पादनही सुरू केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याआधी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस हा ओमायक्रॉनच्या अँटिबॉडी निष्क्रिय करतो, असा दावा केला आहे. परंतु, याबाबतचा डेटा हा लसीकरण नियामक विभागाकडून अद्याप पडताळणी व्हायचा आहे.
0 Comments