'एसटी बंद'चा फटका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना

पुणे : एसटीच्या संपामुळे बससेवा विस्कळित झाली आहे. त्याचा फटका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्य सेवा परीक्षा रविवारी (ता.२३) राज्यातील ३७ जिल्ह्यांत होत आहे. विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या बसमधून गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. काहींनी तर खासगी बससेवेचा पर्याय अवलंबला आहे. राज्यातून विविध ठिकाणांहून विद्यार्थी पुण्यात एमपीएससी परिक्षेची तयारी करण्यासाठी येतात. येथे राहून अभ्यास करतात आणि परिक्षेसाठी आपल्या गावाजवळचे सेंटर निवडतात. परंतु सध्या एसटीचा संप सुरू असल्याने विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी एसटी तुरळक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामध्ये गर्दी होत असल्याने काहींनी खासगी बस प्रवास अवलंबला आहे. याबाबत विद्यार्थी संदीप जाधव म्हणाले, ''अलिबागला जाताना गर्दीतून प्रवास नको म्हणून खासगी बसने प्रवास करण्याचे स्वीकारले, परंतु गावी जाण्यासाठी दोन वाहने बदलावी लागली. त्यामुळे वेळेचा अपव्यय झाला.

चौकट
''कामावर हजर झालेले एसटीचे कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांच्या आधारावर शक्य तितक्या मार्गांवर बसगाड्या सोडल्या जात आहेत. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, उमरगा आदी मार्गांवर वाहतूक सुरू केली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अद्याप बस सेवा सुरू करता आली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला, हे समजू शकतो. परंतु जेवढे एसटी प्रशासनाच्या हातात आहे. तेवढी सेवा दिली जात आहे. पुण्यातून एकूण २०० बस गाड्या विविध मार्गांवर सोडल्या आहेत. या गाड्यांच्या चार ते पाच फेऱ्या होतात.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी

चौकट
पुण्यातून विदर्भात जाण्यासाठी एसटी बस सेवा संपामुळे सुरू नाही. त्यामुळे अमरावतीला जाण्यासाठी खासगी बसने जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तिकिटासाठी अठराशे रुपये मोजावे लागले. एसटी सेवा सुरू असती तर कमी पैसे लागले असते. एसटीचा प्रवास कधीही सुरक्षित वाटतो.
- तेजस पाटील, विद्यार्थी


चौकट
पुण्यातून जळगावला जाण्यासाठी एसटीची बस सेवा नाही. त्यात रेल्वेने गेले तर घरापर्यंत जाण्यासाठी चार गाड्या बदलाव्या लागतात. त्यामुळे खासगी बसने प्रवास करावा लागला. त्यामुळे प्रवासात दोन दिवस वाया गेले.
- प्रशांत इंगळे, विद्यार्थी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या