एकजुटीतून हवेलीचे गतवैभव व लौकीक पून्हा मिळवणे शक्य - कंद.
वाघोली :
मोठी ताकद असूनही केवळ आपसातील समन्वयाअभावी अनेक संस्था गेल्याने हवेलीत प्रमुख पदेच राहिली नाहीत, मात्र एकजुटीने प्रयत्न झाल्यास हवेलीचे गतवैभव व लौकीक पून्हा मिळवणे शक्य असल्याचा विश्वास जिल्ह्य परिषदेचे माजी अध्यक्ष व बॅकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदिप कंद यांनी व्यक्त केला.
केसनंद ग्रामपंचायतींच्या वतीने ग्रामनिधीतील विविध विकासकामाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यानिमित्ताने जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी निवडीबद्दल प्रदिप कंद व विकास दांगट यांचे बंधू नितीन दांगट यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उद्रे, प्रकाश जगताप, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, पीएमआरडीए सदस्य स्वप्नील उंद्रे, माजी सरपंच मिलिंदनाना हरगुडे, सरपंच नितीन गावडे, उपसरपंच सौ.रुपाली हरगुडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
-----------
निरपेक्ष कामांमुळेच सर्वपक्षीय मित्रांनी माझा विजय साकारला.
यावेळी उज्वल भविष्य असलेल्या केसनंद ग्रामपंचायत व कारभाऱ्यांच्या कामाचे कौतुक करुन प्रदिप कंद म्हणाले, 'फारशी तयारी नसतानाही सहकारातली ही निवडणुक प्रथमच लढलो, जवळपास २० दिवसांत ८५० पैकी ६०० मतदारांना थेट भेटून माझी भुमिका मांडली. आजवरच्या राजकारणात साध्या चहाचीही अपेक्षा न ठेवता पक्षविरहीत केलेल्या सकारात्मक कामांमुळेच सर्व पक्षातील अनेक मित्रांनी मोठ्या विश्वासाने सहकार्य करीत माझा विजय साकारला. येत्या काळात नम्रपणे सर्वसामान्यांच्या हिताचा उद्देश ठेवूनच बँकेत काम करणार असल्याचेही त्यांनी नमुद केले. दरम्यान हवेलीचे गतवैभव व लौकीक पून्हा मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रित या, असेही आवाहन त्यांनी केले.
---------
बँकेतील एकाच पक्षाची मक्तेदारी भाजपने मोडीत काढली..
दरम्यान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतकमहोत्सवात बँकेच्या संस्थापकांचाच विसर पडल्याची बाब खेदजनक असून सत्ताधाऱ्यांनी 'अ' वर्गाच्या पाणीपूरवठा संस्था मुद्दामच ‘ड वर्गात नेण्याचा प्रकारही सहकार क्षेत्र व पर्यायाने शेतकरी हिताला बाधा आणणारा असल्याचे टिकास्त्र माजी सभापती रोहीदास उंद्रे यांनी सोडले. तर अभ्यासपूर्ण नियोजनामुळेच प्रदिप कंद व दांगट यांचा विजय साकारला असून जिल्हा बँकेत जोरदार प्रवेश करुन बँकेतील एकाच पक्षाची मक्तेदारीही भाजपने मोडीत काढल्याने हवेलीत परिवर्तनाला सुरुवात झाल्याचेही उंद्रे यांनी नमुद केले.
भाजप व राष्ट्रवादी मोठे भाऊ कधी झाले, कळलंच नाही…
तर पूर्वी हवेलीत शिवसेना मोठी होती. मात्र आधी लहान भावाच्या भुमिकेत असलेले भाजप व नंतरचे राष्ट्रवादी हे आमचे मोठे भाऊ कधी झाले ते आम्हाला कळलंच नाही, असा टोला लगावत शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांनी मनातील खंतही व्यक्त केली.
तर अत्यंत चुरशीच्या लढतीतून विजय संपादन केलेले प्रदिप कंद व विकास दांगट यांची आगामी राजकीय वाटचाल नक्कीच उत्साहवर्धक असेल, असा विश्वास व्यक्त करुन माजी सरपंच मिलिंदनाना हरगुडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
तर प्रास्ताविकात सरपंच नितीन गावडे यांनी विकासकामांचा आढावा घेत प्रदिप कंद व विकास दांगट यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी सचिन जाधव व तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष शंकर वाबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब हरगुडे यांनी सुत्रसंचालन केले. तर प्रमोद हरगुडे यांनी आभार मानले.
........
0 टिप्पण्या