राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही टिपू सुलतानाचे कौतुक केलेय, भाजपला त्यांचाही राजीनामा घ्यावा लागेल'


टिपू सुलतान हा महान योद्धा आणि प्रशासक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे या मुद्द्यावरुन भाजप राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यायला तयार आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तुम्ही म्हणजे इतिहासाचे ठेकेदार नाहीत, हे लक्षात ठेवा.

महाराष्ट्रात दंगली पेटवण्याची भाषा करणाऱ्यांना संजय राऊतांचा सज्जड इशारा

टिपू सुलतानाचं काय करायचं हे राज्य सरकार आणि महापालिका बघून घेईल

मुंबई: मालाडच्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांना गुरुवारी शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचा टिपू सुलतानाच्या नावाला विरोध असेल तर त्यांना सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत टिपू सुलतानाचा गौरव केला होता. टिपू सुलतान हा महान योद्धा आणि प्रशासक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे या मुद्द्यावरुन भाजप राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यायला तयार आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी संजय राऊत यांनी टिपू सुलतानाच्या नावावरुन राजकारण करणाऱ्या भाजपला चांगलेच फटकारले. टिपू सुलतानाचं काय करायचं हे राज्य सरकार आणि महापालिका बघून घेईल. तुम्ही म्हणजे इतिहासाचे ठेकेदार नाहीत, हे लक्षात ठेवा. टिपू सुलतान, श्रीरंग पट्टणम, हैदरअली यांच्याविषयी आम्हालाही माहिती आहे. कोणी काय अत्याचार केलेत, हेदेखील आम्ही जाणतो. पण भाजप सगळा जुना इतिहास पुसून नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत आपण ते पाहतच आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.


तसेच मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपु सुलतानाचे नाव देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास महाराष्ट्र पेटवू, असा इशारा देणाऱ्या भाजप नेत्यांनाही संजय राऊत यांनी सज्जड इशारा दिला. या मुद्द्यावरुन राज्यभरात आंदोलन पेटवू, ही भाषा कोण करत आहे, ते आम्हाला माहिती आहे. तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात दंगली करुनच दाखवा, याठिकाणी ठाकरे सरकार आहे, हे लक्षात ठेवा, असे संजय राऊत यांनी म्हटले.


मालाडमध्ये भाजप आणि हिंदुत्वावादी संघटनांचं आंदोलन


मालाडच्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्याच्या विरोधात बुधवारी मुंबईत भाजप आणि हिंदुत्वावादी संघटनांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी मालाड परिसरातील रस्ते वाहतूक रोखून धरली होती. आंदोलकांनी बेस्टच्या बसेस आणि पोलिसांच्या गाडीतील हवा काढून टाकल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. टिपू सुलतान सुलतान हिंदूविरोधी होता. त्याने हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, हजारो हिंदूंचे धर्मांतरण केले तसेच अनेक हिंदूंची क्रूरपणे हत्या केली आहे. अशा क्रूर आणि हिंदू विरोधी टिपू सुलतानचे नाव क्रीडा मैदानास देण्यास आमचा विरोध आहे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या