शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामिनावर आज सुनावणी होणार आहे.
सिंधुदुर्गातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब कणकवली पोलिसांना शरण आले आहेत. तर, नितेश राणे हे न्यायालयात शरण आले असतानाही त्यांना कस्टडीत का घेतलं नाही, याबाबत कोर्टाच्या कामकाजात पाहणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले. नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग कोर्टात सुनावणी होणार आहे.
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात नितेश राणे यांच्या याचिकेवर मागील आठवड्यात निर्देश देत 10 दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टासमोर शरण जाण्यास सांगितले. राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवस अटकेपासून संरक्षणही दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी नितेश राणे यांनी जिल्हा कोर्टात हजेरी लावली होती. यावेळी त्यांचे बंधू निलेश राणेदेखील उपस्थित होते. नितेश राणे यांच्या बाजूने अॅड. सतीश मानशिंदे आणि अॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. तर, सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांचे म्हणणे कोर्टाने मागवले होते. अॅड. भूषण साळवी यांनी ऑनलाइन सरकारी वकील म्हणून बाजू मांडली होती. मात्र, अॅड. प्रदीप घरत प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने सोमवारी सुनावणी ठेवण्यात आली होती.
सुनावणीसाठी सिंधुदुर्ग कोर्टात आलेल्या अॅड. प्रदीप घरत यांनी म्हटले की, आमदार नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालय शरण आले आहेत. मात्र कस्टडीत का घेतलं नाही, यासंदर्भात आज मी कोर्टाच्या कामकाजात पाहणार आहे. सुनावणीसाठी जिल्हा सत्र न्यायालयात आमदार नितेश राणे हजर होणार आहेत. यावेळी त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
अटकेची टांगती तलवार
सर्वोच्च न्यायलयाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत शरण येण्यासाठी दिली होती. त्यानंतर राणे पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग कोर्टात हजर राहिले. कोर्टाने राणे यांचा जामीन नाकारल्यास नितेश राणे यांना अटक होऊ शकते अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.
स्वीय सचिव शरण
भाजप आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब कणकवली पोलिसांना शरण आलेत. संतोष परब हल्ल्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून राकेश परब यांचाही समावेश आहे. परब आज कणकवली पोलिसांना शरण आले आहेत
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्यात अडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत.
0 टिप्पण्या