दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला



image.png


नवी दिल्ली: दिल्लीत गाझीपूर फूल मार्केट येथे रेकी करून बाजारपेठेत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी उधळला. मार्केटच्या एक नंबर गेटजवळ एका स्कुटीवर बेवारस बॅगमध्ये आयईडी बॉम्ब प्लांट करण्यात आला होता. पोलिसांना टायमरसह लावलेला सुमारे तीन किलो आरडीएक्स असलेला आयईडी बॉम्ब डिफ्युज करता आला नाही. अखेर अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने मार्केटमधील खुल्या जागेत नियंत्रित वातावरणात स्फोट घडवून आणण्यात आला. यावेळी संपूर्ण मार्केट खाली करण्यात आले होते. मार्केटला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली. 

दिल्लीतील गाझीपूर फूल मार्केटच्या गेट नंबर एकबाहेर शुक्रवारी एक बेवारस बॅग आढळून आली. याबाबत माहिती मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एनएसजी टीमलाही पाचारण करण्यात आले. बॉम्ब स्क्वाडने तपासले असता बॅगमध्ये आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बॅग निर्जनस्थळी नेऊन एका खड्ड्यामध्ये या आयईडीचा नियंत्रित स्फोट घडवून आणण्यात आला. वेळीच याबाबत पावले उचलली गेल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर आता हा बॉम्ब कुणी प्लांट केला होता, हा सर्वात कळीचा प्रश्न असून पोलीस आणि इतर यंत्रणा युद्धपातळीवर तपास करत आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. संपूर्ण परिसराची रेकी करून, सर्व माहिती घेऊन त्यानंतर हा बॉम्ब प्लांट करण्यात आला, असेही उपलब्ध पुराव्यांवरून दिसत आहे. मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्यात कॅप्चर होणार नाही, याची दक्षता बॉम्ब प्लांट करणाऱ्या हल्लेखोराने घेतल्याचेही दिसत आहे. गेट नंबर एकजवळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

बॅगमध्ये तीन किलो आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेट होते. त्यात टायमरही लावण्यात आला होता. हा स्फोट घडला असता तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. त्यामुळेच हा घातपाताचा कट असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादिशेने तपास केला जात आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहचली होती. त्याशिवाय एनएसजीकडूनही याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या