जिल्ह्यात ४४८ नवे कोरोना बाधित

रुग्णसंख्या दोन हजारांपर्यंत; सर्वाधिक बाधित नगर शहरात 

नगर : जिल्ह्यात आता पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४४८ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. उपचाराधीन रुग्णसंख्या दोन हजारांच्या जवळ जाऊन ठेपली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्क्यांवर घसरले आहे. सुदैवाने मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी उच्चांकी रुग्ण संख्या नोंदवली गेली. जिल्ह्यात ४४८ नवे रुग्ण आढळून आले. सर्वाधिक १४४ रुग्ण नगर शहरात आहेत. संगमनेर, नेवासा, शेवगाव, कर्जत, जामखेड वगळता अन्य तालुक्यांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. याशिवाय परराज्यातील आणि इतर जिल्ह्यातील रुग्णही वाढले आहेत.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र, रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी दैनंदिन रुग्णसंख्या ७० ते ८० च्या आसपास तर उपचाराधीन रुग्णांची संख्या तीनशे ते चारशेच्या दरम्यान होती. आता दैनंदिन रुग्णसंख्या साडेचारशेवर तर उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली आहे. मात्र, गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आलेला नाही. तरीही दक्षतेच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण आणि करोना चाचणीचे प्रमाण वाढवण्‍यासाठी संबंधितांना सूचना दिल्‍या. जे कोणी निर्बंधांचे उल्लंघन करत असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. कार्यालयामध्ये पूर्व परवानगी शिवाय अभ्यागतांनी येऊ नये याचंही पालन व्हावं, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत निरीक्षक पथके नेमणूक, हॉटेल उपाहारगृह त्यांच्याकडून वेळेचं उल्लंघन होतं का याची तपासणी करावी, दुकाने आणि आस्थापना मालक यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे का याची पडताळणी करावी, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत प्रमाणे सर्वेक्षण करावं, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या