प्रा. एन डी. पाटलांच्या निधनाने शेकापचा लढवय्या नेता हरपला-शंकरराव कोल्हे


कोपरगांव तालुका प्रतिनिधी :

शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाचा प्रमुख आत्मा म्हणून प्रा. एन. डी. पाटील यांनी राज्यात काम करत विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहाचे नेतृत्व सांभाळुन राज्यातील कष्टकरी, शेतकरी, वंचित घटक, गिरणी कामगार, सीमा प्रश्न, जागतिकीकरण यासह कित्येक प्रश्नांची सोडवणुक केली, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यासोबत काम करतांना स्वावलंबनातुन बहुजन समाजाच्या दारात शिक्षणाची गंगोत्री नेतांना जो अनुभव मिळाला तो वाखाणण्याजोगा होता त्यांच्या निधनाने शेकापचा लढवय्या नेता हरपला अशा शब्दात माजीमंत्री शंकररावजी कोल्हे यांनी शोक व्यक्त केला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

           श्री. शंकरराव कोल्हे पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजींग कौन्सील सदस्य म्हणून मला ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी त्यांच्याकडुन खुप काही शिकायला मिळाले. त्या कार्याचा गौरव म्हणून सन २०१२ मध्ये आपणांस रयतचे मानद सचिव पै. ईस्माईल मुल्ला यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श रयत सेवक पुरस्कार चेअरमन एन. डी. पाटील व विधीज्ञ रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते मिळाला होता ही आठवण अजुनही मनांत घर करून राहिलेली आहे. सामाजिक प्रश्नाची सोडवणुक आंदोलनातुन कशी करावी आणि त्यासाठी नेमकेपणाने काय केले पाहिजे याच्या गुजगोष्टी त्यांनी मला शिकविल्या होत्या त्या खंडकरी शेतकरी जमीन सोडविण्यांच्या आंदोलनांत अत्यंत उपयुक्त ठरल्या. 
          राज्याचे सहकारमंत्री म्हणून त्यांची साखर कारखानदारीच्या प्रश्नांत मोलाची मदत होत असे. १९९९ च्या महाराष्ट्र राज्याच्या सत्ता स्थापनेत त्यांनी निमंत्रक म्हणून जबाबदारीने काम केले. १९६० ते १९८२ या काळात महाराष्ट्र विधानसभा कामकाज आणि अधिवेशनाच्या कामकाजातही त्यांची महत्वाची साथ मिळाली. रयतेचा परिवार त्यांच्या निधनाने पोरका झाला आहे. भारताने मुक्त अर्थव्यवस्था करारावर स्वाक्ष-या केल्यानंतर शेतकरी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करार याबाबत संपुर्ण महाराष्ट्रभर शेतक-यांच्या हक्कासंदर्भात जनजागृती करतांना प्रा. एन. डी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या निधनाने आंदोलनकारी प्रश्नांतील नेतृत्व हरपले असेही शंकरराव कोल्हे म्हणाले. संजीवनी कार्यस्थळावर जुलै २००२ मध्ये त्यांचा विशेष सत्कार केल्याची आठवण शंकरराव कोल्हे यांनी बोलून दाखवली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना व उद्योग समुह पाटील कुटूंबियावर कोसळलेल्या दुःखात सहभागी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या