साईबाबांची द्वारकामाई दक्षिणद्वार भाविकांसाठी पुन्हा खुले

शिर्डी :  शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. कोविड संसर्गामुळे गेल्या २२ महिन्यांपासून बंद असलेले द्वारकामाई मंदिराचे दक्षिणद्वार पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयाने देश विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

द्वारकामाईत दर्शनासाठी स्‍वतंत्र दर्शन रांग सुरू करण्‍याचा निर्णय शिर्डी संस्थानच्या नुकत्‍याच झालेल्‍या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी मध्‍यान्‍ह आरतीनंतर हे दार उघडून भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले.
कोरोनामुळे १७ मार्च २०२० रोजी शिर्डीचे बंद करण्‍यात आले होते. त्यानंतर मंदीर खुलं करण्यात आलं. मात्र, सरकारने अटी घातलेल्या आहेत. मंदिरात प्रवेशासाठी व बाहेर जाण्‍याची स्‍वतंत्र गेट असावे, अशा मार्गदर्शक सूचना होत्‍या. त्‍यानुसार साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेताना द्वारकामाई मंदिरात दर्शनासाठी वेगळी रांग लावू नये म्‍हणून मुख्‍य दर्शन रांगेतूनच भाविकांना द्वारकामाईचे दर्शन दिले जात होते.
साईबाबांचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्‍यात आले, तेव्‍हा साईभक्‍त व शिर्डी ग्रामस्‍थांकडून द्वारकामाई मंदिराचे दक्षिण बाजूच्या गेटमधून थेट दर्शन मिळावे, अशी मागणी वारंवार होत होती. मात्र. मधल्या काळात निर्णय होऊ शकला नाही.


चौकट

अलीकडेच संस्‍थानचे अध्‍यक्ष आमदार आशुतोष काळे व विश्‍वस्‍त मंडळाने द्वारकामाईसाठी स्‍वतंत्र मंदिर समजून त्‍याची स्‍वतंत्र दर्शन व्‍यवस्‍था करण्‍याचा सर्वानुमते निर्णय घेतला. त्यामुळे दार उघडून स्वतंत्ररांग लावण्याचा मार्ग मोकळा झाला. आता भाविकांनी सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन द्वारकामाई मंदिरात दर्शनाचा लाभ घ्‍यावा, असं आवाहन संस्‍थान व्‍यवस्‍थापन मंडळातर्फे करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या