वाळूतस्कारांच्या टेम्पोची पोलीस व्हॅनला धडक पोलीस अधिकारी बालंबाल बचावले

  श्रीरामपूर : तालुक्यातील कमालपूर या गोदावरी नदीपात्र गावामध्ये रविवारी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस व्हॅनला वाळूतस्करी करणाऱ्या टेम्पो चालकाने जोराची धडक दिली. येथे घडलेल्या 

 घटनेत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह गाडीत बसलेले कर्मचारी बालंबाल बचावले. 
     याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी चोख बंदोबस्त लावला होता. या बंदोबस्ताच्या निमित्ताने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर 
साळवे हे कमालपूर गावात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक पिवळ्या रंगाचा विनानंबर टेम्पो कमालपूर रस्त्यावरून जाताना दिसला होता. त्यावेळी पोलीस निरीक्षकांनी यांनी टेम्पो चालक वाळू तस्कराला थांबण्यास सांगितले होते. परंतु तो थांबला नाही म्हणून पोलीस निरीक्षक साळवे यांनी धाडस दाखवत पोलीस वाहनातून या वाळूतस्कर टेम्पोचा एक किलोमीटरपर्यंत पुढे कमालपूर रोडवरून पाठलाग केला. या पाठलागादरम्यानच टेम्पो चालकाने पोलिसांच्या गाडीला जोराची धडक दिली. तेथून पुढे जाऊन टेम्पो सोडून तो पळून गेला. 
  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात हा टेम्पो जप्त करण्यात आला. त्या फरार वाळूतस्कराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीरामपूरचे डीवायएसपी संदिप मिटके व पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस या वाळूतस्कर आरोपीचा कसून शोध घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या