आठवडी बाजारात मोबाईल चोर रंगेहाथ पकडला


शिरुरकासार :
  गेवराई तालुक्यातील तांदळा येथे दि. २२ शनिवारी रोजी आठवडी बाजारात सकाळी नऊ वाजता एका सराईत मोबाईल चोराला पकडून बाजारातील नागरिकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर चकलंबा पोलिसांना कळवण्यात आले. दरम्यान चकलंबा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व या चोराला पोलीस कॉन्स्टेबल खेडकर यांच्या ताब्यात देण्यात आले. तांदळा कोळगाव व तिंतरवणी येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. बाजार करण्यासाठी आलेले लोक भाजीपाला खरेदी करण्यासाठी धावपळ करत असतात. याच धामधुमीत चोरटे आपला डाव साधुन घेतात. काही दिवसापूर्वी तांदळा येथे चार तरुणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. परिसरातील अनेक जणांचे मोबाईल या बाजारात चोरीला गेले आहेत. बाहेरून येणार्‍या या चोरांनी बाजारात उच्छाद मांडला होता. प्रत्येक शनिवारी आठवडी बाजारात कोणाचा ना कोणाचा मोबाईल कायम चोरीस जात होता. या प्रकाराला येथील नागरिक, व्यापारी कंटाळले होते. दरम्यान आज सकाळी नऊ वाजता तांदळा येथे बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी एका मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून त्याची धुलाई केली. त्यानंतर या मोबाईल चोराला चकलंबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या चोरट्याचे नाव प्रशांत गायकवाड रा. बीड असे असून त्याचे दोन साथीदार बाजारातून पळ काढत चारचाकी सिफ्ट गाडीमध्ये बसून पळून जाण्यात यशस्वी झाले. या चोरट्या विरुध्द विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या या चोराला नागरिकांनी चांगला प्रसाद दिला. याप्रकारामुळे चोरट्यांवर जरब बसून मोबाईल चोरीचे प्रमाण कमी व्हावे, अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या