न्हावरे पोस्ट कार्यालयात चोरीचा प्रयत्न


मांडवगण फराटा :
न्हावरे (ता. शिरूर) येथील मध्यवर्ती वस्तीत असलेले पोस्ट कार्यालय व बंद असलेली दोन घरे फोडून चोरी करण्याचा चोरट्यांचा डाव ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे व घटनास्थळी पोलीस तत्काळ हजर झाल्याने फसला.


पोलिसांनी व येथील युवकांनी सिनेस्टाईल चोरट्याचा पाठलाग केला. मात्र गुंगारा देऊन चोरटे मोटारसायकलवर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या घटनेने न्हावरे परिसरात खळबळ उडाली आहे. न्हावरे गावाच्या मध्यवर्ती भागात पोस्ट कार्यालय आहे. शनिवारी (दि. ८) मध्यरात्री पोस्टाचे दार उघडण्याचा प्रयत्न कुणीतरी करत असल्याचे पोस्ट कार्यालया शेजारील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. दरम्यान, शेजारील युवकांनी भ्रमणध्वनीवर आळीतील सर्वांना जागे केले. पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. चोरट्यांनी पोस्ट कार्यालयातील पार्सल फोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. त्यानंतर त्यांनी गावातील दोन बंद असलेल्या घरांची कुलुपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. न्हावरे पोलीस दूरक्षेत्र केंद्राचे पोलीस हवालदार गोपीनाथ चव्हाण यांनी तत्काळ हजर होऊन प्रसंगावधान राखून चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन धूम ठोकली. घटनास्थळी शिरूरच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चेरापल्ली यांनी रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत हजर होऊन पुढील तपास सुरू केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या