आढळला दुर्मिळ विषारीजातीचा पोवळा साप

रांजणगाव गणपती : 


तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे सापडलेल्या पोवळा जातीच्या दुर्मिळ सापाला वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांनी जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे. येथील बाजार मैदान येथे एका घरासमोर विषारी व दुर्मिळ जातीचा पोवळा साप आढळून आला. त्यावेळी वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांनी त्या दुर्मिळ सापाला पकडुन निसर्गाच्या सानिध्यात सोडुन दिले. 

तळेगाव ढमढेरे येथील बाजार मैदान शेजारी राहणाऱ्या सचिन कांबळे यांना सकाळच्या सुमारास त्यांच्या घराच्या समोर अतिशय पातळ व वेगळा साप दिसून आल्याने त्यांनी तातडीने वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुका सचिव शेरखान शेख यांना फोन करुन आमच्या घराचे समोर सुतुळी सारखा अतिशय पातळ आणि डोके काळे असलेला वेगळाच साप असल्याचे सांगितले.

 त्यावेळी वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, सचिव शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी तेथे धाव घेत पाहणी केली, असता त्यांना तेथे अतिशय दुर्मिळ असा विषारी पोवळा जातीचा साप आढळून आला. यावेळी सर्पमित्रांनी त्याला कौशल्याने पकडून जीवदान दिले, तर या साप बाबतची माहिती शिरुर वनविभागाचे वनरक्षक प्रमोद पाटील यांना देत सदर सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या