महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का?, राजू शेट्टींचं राहुल गांधींना पत्र; म्हणाले, “ठाकरे सरकार मोदींना पाठिंबा…”


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आहे. राजू शेट्टी यांनी राहुल गांधींकडे राज्यातील भूमी अधिग्रहण कायद्यातील बदलाविरोधात तक्रार केली आहे. काँग्रेसचं धोरण बदललं आहे की महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आता तुमचं ऐकत नाही अशी विचारणा राजू शेट्टी यांनी यावेळी केली आहे.

राजू शेट्टी यांनी राहुल गांधींना लिहिलेलं पत्र ट्वीट केलं असून म्हटलं आहे की, “२०१३ मध्ये काँग्रेसने तयार केलेल्या भूमी अधिग्रहण कायद्यात २०१५ ला मोदी सरकार दुरुस्ती करत बदल करणार होतं. तेव्हा तुमच्या पक्षाने शेतकऱ्यांना साथ देत त्याचा विरोध केला होता. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या कायद्यात दुरुस्ती करत शेतकरीविरोधी भूमी अधिग्रहणाचा कायदा केला. काँग्रेसचं धोरण बदललं आहे की, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते तुमचं ऐकत नाहीत?”

“२०१३ मध्ये जंतर मंतरवर भूमी अधीग्रहण तसंच इतर मुद्द्यांवर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर सोनिया गांधी यांनी जयराम रमेश यांना लक्ष घालत यावर तोडगा काढण्यात सांगितलं होतं. युपीएने इतर पक्षांसोबत चर्चा करत देशासाठी जमीन अधिग्रहण धोरण आणलं. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी तसंच यासाठी जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा चांगला निर्णय होता,” असं राजू शेट्टींनी सांगितलं आहे.

“पण २०१५ मध्ये मोदी आणि त्यांच्या सरकारने अदानी आणि अंबानी यांच्या दबावामुळे या कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. यातील बदलांमुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान होणार होतं. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इतर शेतकरी संघटनांसोबत मिळून मोदी सरकारकडून केल्या जाणाऱ्या बदलांना विरोध केला,” अशी आठवण यावेळी त्यांनी करुन दिली.

“तुम्ही हा मुद्दा लोकसभेत मांडत आमच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. पण मोदींनी खेळी करत हा चेंडू कोर्टात ढकलला. दुर्दैवाने आता महाराष्ट्र काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या साथीने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणत आहे. नुकतंच महाराष्ट्र सरकारने एखाद्या शेतकऱ्याची जमीन घेतल्यास त्याला मिळणारी किंमत अर्ध्यावर आणली आहे. महाराष्ट्र सरकार मोदींना पाठिंबा देत असल्याचं दिसत असून बाळासाहेब थोरात यांनाही याची कल्पना आहे. तुम्ही तात्काळ महाराष्ट्राच्या नेतृत्वाला हा निर्णय मागे घेण्यास सांगावं,” अशी विनंती त्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या