दाउद इब्राहिम कनेक्शन; नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू


राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे.

जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीच पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

”देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू” असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता.

तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत.

ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

आज सकाळी नवाब मलिक यांनी चौकशीसाठी ईडी कार्यलयात आणलं गेल्यानंतर आणि ही बातमी बाहेर आल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यलयाबाहेर जमण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

“मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी....!” ; आशिष शेलारांनी लगावला टोला

“मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….! असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही. पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच!” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.

...हे काय महाविकास आघाडी सरकार नाही ; तर कोर्ट ला जाब विचारेल - भाजपाचा शरद पवारांवर निशाणा

''शरद पवारजी, आरोप केल्याने, पत्रकार परिषद घेतल्याने कारवाई करायला हे काही राज्यातील महाविकास आघाडी सरकार नाही. चौकशी ही पुराव्याच्या आधारावर होते. जर निर्दोष असतील तर सुटतील. नवाब मलिक जास्त बोलत होते म्हणून कारवाई करत असेल. तर कोर्ट ला जाब विचारेल.'' असं म्हणत भाजपाने ट्वीटद्वारे शरद पवार यांनी नवाब मलिकांवरील कारवाईवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

“ना डरेंगे ना झुकेंगे ! नवाब मलिक कार्यालयाकडून ट्वीट

“आज सकाळी ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या निवास्थानी आलं होतं. ते नवाब मलिक यांनी आपल्या वाहनात ईडी कार्यालयात घेऊन गेले आहेत. अॅड. अमीर मलिक नवाब मलिक यांचे चिरंजीव हे देखील नवाब मलिक यांच्यासोबत गेले आहेत.” असं ट्वीट नवाब मलिक यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

नवाब मलिक जे काही खरे आहे ते सांगतील; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

विरोधात असताना ईडीच्या नोटीस येतात आणि पक्ष बदलल्या नंतर ती नोटीस विरघळून जाते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ईडीचे अधिकारी सकाळीच चौकशीसाठी घेऊन गेल्यानतंर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर जाऊन धडकणा असून, तिथे आंदोलन होणार आहे.

२०२४ पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत - संजय राऊतांचा केंद्रीय यंत्रणांना इशारा

''२०२४ पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत.'', असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणासह भाजपाला इशारा दिला आहे. तसेच, ''२०२४ नंतर ज्या गोष्टी घडणार आहेत त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी.'' असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे. 

नवाब मलिकांची चौकशी सुरु असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे अशी टीका केली आहे. ते म्हणाले की, “हा सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे, कोणतीही, सूचना ने देता पहाटे सहा वाजता येऊन ईडी स्वतःच पोलीस आणत राज्यातील मंत्र्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली आहे”.

...मात्र सत्याचा आवाज कोण दाबू शकत नाही - क्लाईड क्रास्टो

''केंद्रातील भाजपा सरकारविरोधात ठाम भूमिका आणि अनेक कारनामे उघड करणारे राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र सत्याचा आवाज कोण दाबू शकत नाही.'' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, केंद्रातील भाजपसरकार महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून जोरदार आवाज उठवला आहे. त्याचाच भाग म्हणून नवाब मलिक यांच्याविरोधात अशाप्रकारची कारवाई केली जात आहे. मात्र सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. असंही ते म्हणाले आहेत.

नवाब मलिकांवर ईडीकडून झालेल्या कारवाईवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रियी, म्हणाले...

''आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण, नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना अशाप्रकारे त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही.'' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आता मलिकांच्या घऱाबाहेर गर्दी सुरू झाली आहे.

नवाब मलिक यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमण्यास सुरूवात

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पहाटेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरून चौकशीसाठी नेल्याचं वृत्त समोस येताच, राष्ट्रवादी काँग्रसेचे कार्यकर्ते नवाब मलिकांच्या घराबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे.

पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांची घरी धडरकलं

जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं

नवाब मलिक ईडीच्या रडावर

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडावर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या