जेवढं भुंकायचं तेवढं भुंका....; संजय राऊत यांचा पलटवार


मुंबई :
करोना काळात कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर संजय राऊत यांनी आज, रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला काय फायली काढायच्या तेवढ्या बाहेर काढा. कोणताही घोटाळा झाला नाही हे आधीच सांगितलं आहे. कुणी भुंकत असतं. सवयच असते त्यांना. त्यांना भुंकू द्या, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली. शिवसेनेकडून या सगळ्याचं उत्तर दिले जाणार आहे. येत्या मंगळवारी, १५ तारखेला शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद माझी वैयक्तिक नसून, शिवसेनेची असेल. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होईल. त्यामुळे तुम्हाला तोपर्यंत किती फायली बाहेर काढायच्या तेवढ्या काढाव्यात, असं आव्हानही त्यांनी दिलं. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो करोना केंद्रातील भ्रष्टाचाराबाबत आरोप करत मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला होता. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी सोमय्या नुकतेच महापालिकेत येऊन गेले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. करोनाचे सावट आल्यापासून मी दर आठवड्याला आढावा बैठक घेत आहे. त्यामध्ये पुणे तसेच पिंपरी चिंचवडचे महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी, 'पीएमआरडीए'चे आयुक्त आदींचा सहभाग असतो. सर्वांच्या सहमतीनेच या बैठकीतले सर्व निर्णय घेतले जातात. करोना काळात केलेल्या कामांमध्ये राज्य सरकार, जिल्हा वार्षिक योजना, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचाही हिस्सा आहे', असेही अजित पवार यांनी म्हटले होते. जम्बो करोना केंद्रात भ्रष्टाचार झालेलाच नाही, असं ते म्हणाले होते.सोमय्यांच्या आरोपांबाबत आज, रविवारी संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता, त्यांनीही रोखठोक उत्तरे दिली. जम्बो करोना केंद्रात कोणताही घोटाळा झाला नाही, हे अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. सोमय्या यांच्या आरोपांना शिवसेना उत्तर देणार आहे. मंगळवारी पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना भवनात संध्याकाळी चार वाजता ही पत्रकार परिषद होत आहे. जेवढ्या फायली तोपर्यंत काढायच्या तर काढा, असा इशारा राऊत यांनी दिला.

👭 चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळेल, असं भाकित भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले होते. त्यावर बोलताना राऊत यांनी उपरोधिक टीका केली आहे. चंद्रकांत पाटील हे निर्मळ मनाचे आहेत. एक चांगली व्यक्ती आहे. त्यांच्या वेदना आम्ही समजू शकतो. चंद्रकांत पाटील हे तारखांवर तारखा देत राहतील. तारखा देऊनही सरकार पडत नाही. आम्हाला पाडता पाडता ते स्वतःच पडले, असा टोला राऊत यांनी लगावला. यावेळी राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या आसामच्या मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे अख्खे आयुष्य काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी त्यांना साक्षात्कार झाला नाही. आपल्या माजी नेत्याच्या विरोधात असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

👴 उत्तर प्रदेशात अखिलेश यादव पुढे, गोव्यात काँग्रेस

उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केले. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव हे पुढे आहेत, असे ते म्हणाले. गोव्यातही काँग्रेस सध्यातरी पुढे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस तेथे ठाण मांडून आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा. पण जमिनीवरील चित्र वेगळे आहे, मला काय म्हणायचे आहे ते समजून जातील, उत्पल पर्रिकरांना तिथे चांगला पाठिंबा मिळत आहे. ही बाब चांगली आहे, असेही राऊत म्हणाले.

👽 वाराणसीत जाऊन एफआयआर दाखल करा

कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सांगणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते योग्यच आहे. कोविड काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या कामाचे जगभरातून कौतुक झाले आहे. आमच्याकडे गंगेत मृतदेह वाहून जात नव्हते. ज्यांना एफआयआर दाखल करायचा आहे, त्यांनी वाराणसीत दाखल करावा. कोविड काळात तिकडे किती मोठा भ्रष्टाचार झाला आहे, याची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत करावा. तशी मागणी करावी. कुणी भुंकत असेल तर, त्याकडे राज्यातील जनता लक्ष देत नाही, असंही राऊत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या