आ. बोरणारे यांच्याकडून महिलेला बेदम मारहाण

 

भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याचा राग
आ. बोरणारे यांच्याकडून महिलेला बेदम मारहाण

वैजापूर :

भारतीय जनता पक्षाच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहील्याच्या कारणावरून सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यासह भाऊ, पत्नी व  घरातील अन्य सदस्यांनी महिलेसह तिच्या पतीस भररस्त्यावर बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना 18 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास शहरातील गोदावरी वसाहत परिसरात घडली. दरम्यान ज्या महिलेला मारहाण करण्यात आली. 

ती महिला आमदारांची सख्खी चुलत भावजयी ( वहिनी ) आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे 17 फेब्रुवारी रोजी वैजापूर  तालुक्यातील विविध कार्यक्रमांसाठी आले होते. तालुक्यातील  सटाणा येथील भारतीय जनता पक्षाच्या शाखा उद्घाटनासाठी डाॅ. कराड गेले होते. याच कार्यक्रमात आमदार रमेश बोरनारे यांच्या वहिनी जयश्री दिलीप बोरनारे यांच्यासह  त्यांच्या घरातील सदस्यांनी उपस्थित राहून डाॅ. कराड यांचा सत्कार केला होता. दुसऱ्या दिवशी  म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी जयश्री बोरनारे व पती दिलीप बोरनारे शहरातील गोदावरी वसाहतीमध्ये एका वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमास आले होते.

 यावेळी आमदार रमेश बोरनारे यांच्यासह पत्नी संगिता बोरनारे,  त्यांचा भाऊ संजय बोरनारे, वर्षा संजय बोरनारे,   दीपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य संपत बोरनारे, रंजीत मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बोरनारे, अबोली संजय बोरनारे ( सर्व रा. मुरारी पार्क, वैजापूर ) व दिनेश शाहू बोरनारे ( रा. सटाणा ) असे दहाजण कार्यक्रमस्थळी हजर होते. त्यानंतर आमदार बोरनारे व अन्य सदस्यांनी जयश्री बोरनारे व त्यांच्या पतीस मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही रस्त्यावर या. असे म्हणून दोघांना रस्त्यावर बोलावून घेतल्यानंतर दोघांनाही काल सटाणा येथे  झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमास का उपस्थित राहीलात. अशी विचारणा करून शिवीगाळ करू लागले. परंतु जयश्री बोरनारे यांनी  शिवीगाळ करू नका. असे सांगत असतानाच आमदार बोरनारे व त्यांचा भाऊ संजय बोरनारे यांच्यासह अन्य सदस्यांनी  त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. याशिवाय पती दिलीप बोरनारे यांनाही मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी दिली. कार्यक्रमस्थळी असलेल्या नातलगांनी भांडण सोडवासोडवी  केली. या घटनेत महिलेच्या अंगावर मारहाणीचे व्रण उमटले असून मुक्का मार लागला आहे.  याप्रकरणी जयश्री दिलीप बोरनारे (41)  रा.  सटाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार रमेश बोरनारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 माझा हा घरगुती विषय असून आरोप केलेली महिला माझ्या सख्या चुलत भावाची पत्नी आहे. तिने तिच्या सासूला म्हणजेच माझ्या चुलतीला घरातून हाकलून दिले. मी कुटुंबप्रमुख या नात्याने समजावून सांगणे माझे काम आहे. माझी पत्नी व तिच्यात काहीतरी वाद झाला. एवढेच मला माहिती आहे. या वादाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करू नये. 

  - रमेश बोरनारे, आमदार, वैजापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या