Breaking News

वेषावर नव्हे, देशावर बोला; 'हिजाब' वादावरून राष्ट्रवादीच्या आमदाराचे खडे बोल


शाळा, कॉलेजामध्ये हिजाब घालण्याच्या मुद्द्यावरून सध्या सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला हाणला आहे.

अहमदनगर : अहमदनगर कर्नाटकमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांनीच्या हिजाब घालून महाविद्यालयात येण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. हे प्रकरण कोर्टातही गेले आहे. केवळ कर्नाटकच नव्हे तर विविध राज्यांतून यावर प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यावर भाष्य केले आहे. हा विषय राजकीय पोळ्या शेकण्यासाठी उपस्थित केल्याचे सांगून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कुणी कोणता 'वेष' घालायचा याऐवजी देश कुठं चाललाय यावर बोलण्याची गरज आहे, अशा शब्दांत आमदार पवार यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. कर्नाटकातील उडुपी येथील सरकारी कॉलेजमध्ये जानेवारी महिन्यात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना कॉलेज परिसर सोडण्यास सांगण्यात आले. यावरून हा वाद पेटला आहे. हिजाब विरुद्ध भगवे स्कार्फ इथपर्यंत या वादाचा प्रवास झाला. परिस्थिती हताबाहेर जात असल्याचे पाहून तेथील सरकारने शाळा-महाविद्यालये बंद ठेवली. या प्रकरणाला पुढे राजकीय रंग आला. शेवटी यासंबंधी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली. अंतिम निर्णय येईपर्यंत विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे धार्मिक पोषाख परिधान करण्यासाठी आग्रही राहू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यावरून सुरू झालेली राजकीय चर्चा मात्र, सुरूच आहे. यावर आमदार पवार यांनी म्हटले आहे, ‘आज कुणी कोणता 'वेष' घालायचा याऐवजी देश कुठं चाललाय यावर बोलण्याची गरज आहे. करोना काळात निर्माण झालेला स्किलगॅप, वाढलेला ड्रॉप आऊट रेट, बालगुन्हेगारी, काळाची पावले ओळखून आवश्यक असलेले कौशल्य विकास कार्यक्रम, ऑनलाईन शिक्षणाचे परिणाम याचा विचार करण्याची गरज आहे. पण आज आपण कशात अडकून पडलोय? एखाद्या राज्यात निवडणुका लागताच काही मुद्द्यांना जाणीवपूर्वक हवा दिली जाते की काय, अशी शंका येते. यामुळं काही पक्षांच्या राजकीय पोळ्या शेकल्या जातील, पण एका पिढीचं भविष्य धुळीला मिळेल, हे प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे,’ हा धोकाही पवार यांनी लक्षात आणून दिला आहे.

Post a Comment

0 Comments