‘शिवजयंती एकाच तारखेला हवी’


औरंगाबाद :
शिवजयंती तिथीनुसार करण्याचा सरकारमधील शिवसेनेचा अट्टाहास कमी होताना दिसत आहे. मात्र, शिवजयंती एकाच तारखेला करावी अशी मागणी आहेच, असे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे व आमदार संजय शिरसाठ यांनी सोमवारी सांगितले. औरंगाबाद शहरात उभारण्यात आलेल्या ६२ फुटाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ाचे उद्घाटन कोणत्या तारखेला करायचे व कोणाच्या हस्ते याचा निर्णयही पालकमंत्री घेतील असे पत्रकार बैठकीत सांगण्यात आले.

औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे काम आता पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान शिवजागर उत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात ३६ वॉर्डातून मशाल रॅली काढण्यात येणार असून ती मशाल क्रांती चौकातील मशाली ज्योतीमध्ये विसर्जित करण्यात येणार आहे. या मशालयात्रेचे नेतृत्व उपजिल्हाप्रमुख करणार आहेत. याशिवाय  सकाळी व संध्याकाळी शिववंदना होणार असून एक फेरी दलित आघाडी व अल्पसंख्याक अघाडीच्या वतीने करण्यात येणार आहे.

शिवजयंती हा उत्साह केवळ सत्ता असेपर्यंतच १९ फेब्रुवारीला असेल की सत्ता गेल्यावर पुन्हा तिथीनुसार शिवजयंतीचा आग्रह धरला जाईल असे पत्रकार बैठकीत विचारले असता, खरे तर दररोज शिवजयंती साजरी केली तरी कमीच आहे. एकाच दिवशी शिवजयंती महोत्सव असावा असा आमचा आग्रह आहे. पण या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असे आमदार संजय शिरसाठ म्हणाले. तर आता १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती व्हावी असे वाटत असून तो एकाच तारखेबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल. पण शिवजयंती एकाच तारखेला असावी ही मागणी कायम असल्याचे आमदार अंबादास दानवे म्हणाले. शहरातील पुतळा अनावरणाचे मुख्य अतिथी कोण यावरून सध्या घोळ सुरू असून त्याचे निर्णय लवकरच पालकमंत्री सुभाष देसाई घेतील. त्यांनी सर्वपक्षीय मंडळींना आमंत्रण दिले असल्याचेही आमदार शिरसाठ म्हणाले. या पत्रकार बैठकीस आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले याची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या