एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या


नैराश्यातून शिक्षकाने जीव दिल्याचं समोर आलं आहे. तर व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेतला. तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नाही.

बीड : गेल्या 24 तासांत शिक्षक आणि शेतकऱ्यासह तिघा जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुका अक्षरशः हादरून गेला आहे. शिक्षक सुरेश बडे, शेतकरी रामचंद्र गरुड आणि कृष्णा कोके या तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली. या तिघांनीही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. नैराश्यातून शिक्षकाने जीव दिल्याचं समोर आलं आहे. तर व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेतला. तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नाही.


शिक्षकाचा घरात गळफास

पहिली घटना, शहरालगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प येथे घडली. सुरेश रामकिसन बडे (वय 37, रा. गावंदरा ता. धारूर) हे शिक्षक तिथे राहत होते. त्यांनी नैराश्यातून गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बढे यांच्या निदर्शनास आली. त्यांच्या माहितीवरुन माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाचा बेल्टने गळफास

दुसरी घटना, राजेवाडी येथे कृष्णा बालासाहेब कोके (वय 19 वर्षा) या युवकाने आत्महत्या केली. बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कमरेला असलेल्या बेल्टच्या सहाय्याने त्याने राहत्या घरी गळफास घेतला. मात्र कृष्णाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी दिंद्रुड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.


शेतकऱ्याची लिंबाच्या झाडाला लटकून आत्महत्या

तिसरी घटना, राजेगाव येथील रामचंद्र धुराजी गरड (वय 40 ) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची आहे. व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून त्यांनी आयुष्याची अखेर केली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत आत्महत्येच्या तीन घटना घडल्याने माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या