पोलिसांशी हुज्जत घालणे निलेश राणेंना पडणार महागात, गुन्हा दाखल, आता पुढे काय घडणार?


काही दिवसांपूर्वीच नितेश राणे अज्ञातवासात असताना त्यांचा ठावठिकाणा माहिती असला तरी सांगणार नाही, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना थेट चौकशीची नोटीस पाठवून त्यांची कायदेशीर कोंडी केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करुन राणे कुटुंबीयांना आणखी एक धक्का दिला आहे. पोलिसांनी निलेश राणे आणि त्यांच्या पाच समर्थकांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे निलेश राणे पोलीस अधिकाऱ्यांशी वरच्या पट्टीत बोलत होते

सिंधुदुर्ग: सत्र न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घालणे भाजप नेते निलेश राणे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण आता ओरोस पोलिसांनी निलेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याप्रकरणात पुढे कारवाई झाल्यास राणे कुटुंबीयांना आणखी एक धक्का बसू शकतो. सध्या संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे जामिनासाठी न्यायालयात फेऱ्या मारत आहेत. काही दिवसांपूर्वीच नितेश राणे अज्ञातवासात असताना त्यांचा ठावठिकाणा माहिती असला तरी सांगणार नाही, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना थेट चौकशीची नोटीस पाठवून त्यांची कायदेशीर कोंडी केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करुन राणे कुटुंबीयांना आणखी एक धक्का दिला आहे. पोलिसांनी निलेश राणे आणि त्यांच्या पाच समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री पोलिसांनी निलेश राणे यांच्यावर भादवी कलम १८८ व २६८, २७० पोलिसांशी हुज्जत घालणे १८६ अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. निलेश राणे यांच्यावर पोलिसांशी हुज्जत घालणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे, या दोन कलमांखाली गुन्हा दाखल व्हावा, यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक आग्रही होते. वैभव नाईक यांनी पोलिसांनी तसे पत्रही पाठवले होते.

नितेश राणेंचा जामिन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नाकारला

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मंगळवारी नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळाला होता. यानंतर नितेश राणे गाडीत बसून न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडत असताना पोलिसांनी त्यांची गाडी रोखून धरली होती. त्यावेळी नितेश यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे कमालीचे आक्रमक झाले होते. निलेश राणे पोलीस अधिकाऱ्यांशी वरच्या पट्टीत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले असताना पोलीस आमची गाडी अडवूच कशी शकतात, असा जाब निलेश राणे यांनी पोलिसांनी विचारला. बराचवेळ हा वाद सुरु होता. तेव्हा निलेश राणे तावातावाने पोलिसांशी बोलत होते. अखेर नितेश राणे गाडीतून बाहेर पडून पुन्हा न्यायालयात गेले होते. याठिकाणी तांत्रिक कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर नितेश राणे यांना कोर्टाच्या आवारातून बाहेर जाऊन देण्यात आले होते.

पोलिसांची दादागिरी, सर्वोच्च न्यायलयाचा अवमान; नितेश राणे यांच्या वकिलांचा दावा

पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी अडवल्यामुळे त्यांचे वकील संतप्त झाले. पोलीस दादागिरी करत आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत नितेश राणे यांना अटक करायची आहे. मात्र, तसे घडणार नाही. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचेही नितेश राणे यांच्या वकिलांनी म्हटले.

...त्याशिवाय नितेश राणे यांना जामीन मिळणारच नाही: अनिल परब

नितेश राणे यांनी सत्र न्यायालयासमोर जामीनासाठी अर्ज केला असला तरी त्यांनी अजूनही शरणागती पत्कारलेली नाही. जोपर्यंत नितेश राणे यांना अटक होत नाही तोपर्यंत त्यांना जामीन मिळणारच नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते अनिल परब यांनी केले होते. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना १० दिवसांच्या आत सत्र न्यायालयासमोर शरण जायला सांगितले होते. परंतु, नितेश राणे यांनी केवळ जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांनी अद्याप शरणागती पत्कारलेली नाही. त्यामुळे ते जामिनासाठी पात्र ठरुच शकत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात केला. हा युक्तिवाद मान्य करत सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याचे अनिल परब यांनी सांगितले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या