“उद्धव ठाकरेंचं पुन्हा ‘सूड दुर्गे सूड”, दिशा सालियान प्रकरणावरून भाजपाचा निशाणा!


अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या दिशा सालियानचा मृत्यू होऊन आता जवळपास दोन वर्ष उलटली आहेत. मात्र, त्यानंतर आता पुन्हा एकदा तिच्या मृत्यूवरून नव्याने चर्चा सुरू झाली असून त्यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालियानच्या मृत्यूसंदर्भात गंभीर दावे केले होते. तसेच, त्यांचे पुत्र नितेश राणेंनी देखील त्याबाबत विधानं केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात आता भाजपाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.

महिला आयोगाच्या अहवालानंतर नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासंदर्भात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांचे पुन्हा ‘सूड दुर्गे सूड’…दिशा सालीयन प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार यांच्याविरोधात. खुनशी ठाकरे सरकारचा निषेध”, असं अतुल भातखळकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

“८ जूनला दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. सांगितलं आत्महत्या केली. एक तर ती त्या पार्टीला जात नव्हती. तिला जबरदस्तीनं बोलावलं. तिचा मित्र रोहन राय तिला घेउन गेला. त्यानंतर ती घरी निघाली. पोलीस सुरक्षा कुणाला होती? तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर सुरक्षा कुणाची होती? सालियानचा पोस्ट मॉर्टमचा अहवाल अद्याप आला नाही, का नाही आला? तो ७ महिन्यांत यायला हवा होता. तिच्या इमारतीच्या सुरक्षा गार्डजवळच्या रजिस्टरची ८ जूनची पानं का नाहीयेत? ती कुणी फाडली? कुणाला त्यात रस होता?” असे सवाल नारायण राणेंनी उपस्थित केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या