औरंगाबादमध्ये हिजाबविक्री तीन दिवसांत दुप्पट ; कर्नाटकातील घटनेचे पडसाद


औरंगाबादमधील गुलमंडी, सिटी पोलीस चौक परिसरात बुरखा, हिजाब विक्रीची २५ ते ३०, तर इतर भागांत मिळून शंभरावर दुकाने आहेत.

औरंगाबाद : कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत असतानाच औरंगाबादमध्ये मात्र, गेल्या तीन दिवसांत त्याची विक्री दुप्पट झाली आहे. विक्रेते हिजाब खरेदीवर आता १० ते २० टक्के सवलतही देत आहेत. औरंगाबादमधील गुलमंडी, सिटी पोलीस चौक परिसरात बुरखा, हिजाब विक्रीची २५ ते ३०, तर इतर भागांत मिळून शंभरावर दुकाने आहेत. गुलमंडी हा औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात येणारा भाग मुस्लीमबहुल आहे. २०१९च्या मतदार नोंदीनुसार या मतदारसंघात एक लाख ५७ हजार ४३६ एवढी महिला मतदारांची संख्या आहे. इतरही भागातील मुस्लीम महिला गुलमंडी परिसरातच बुरखा, हिजाब खरेदीसाठी येतात. सिटी चौकात बुरखाविक्रीचे दुकान असलेले तरुण व्यावसायिक इम्रानखान, शेख वहीद आणि मुदस्सीर खान यांनी गेल्या दोन-तीन दिवसांत हिजाब खरेदी दुपटीने वाढल्याचे सांगितले. तीन दिवसांपूर्वी दिवसभरात एका दुकानातून ५०च्या आसपास हिजाब, बुरख्याची खरेदी होत होती. सध्या हिजाबचा विषय देशभर चर्चेत आल्याने खरेदीकडे कल वाढू लागला असून बाजारपेठेतील गणितानुसार व्यवसाय वाढवण्यासाठी सवलत देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. एरवी दीडशे रुपयांना विक्री होणारा हिजाब शंभर सव्वाशे रुपयांपर्यंत दिला जात  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या