युक्रेनमधून २२० भारतीय सुखरुप परत

 


मुंबई : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धस्थितीमुळे जीव टांगणीला लागलेले तेथील भारतीय नागरिक आणि त्यांचे भारतातील हवालदिल नातेवाईक यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. युक्रेनमधील २२० भारतीय नागरिकांना घेऊन आलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे सुरक्षित अवतरण शनिवारी रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी मुंबई विमानतळावर झाले.

विमानतळाबाहेर पडताच नातेवाईकांनी विद्यार्थ्यांना गराडा घातले. तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या नातवंडांना घेण्यासाठी विमानतळावर पोहोचलेल्या  आजी-आजोबांनी त्यांची गळाभेट घेत आनंद साजरा केला.

युक्रेनवरून परतलेले बहुतांशी नागरिक हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. युद्धस्थितीपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला नसला तरी  युद्धाच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या. त्यांचे भारतातील नातेवाईक सतत दूरध्वनीवरून संपर्कात होते. युद्धस्थितीपासून काही अंतरावर असलेले विद्यार्थी सुरक्षित होते; मात्र त्यांनी काही प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकल्याचा अनुभव सांगितला.

युक्रेनमध्ये सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे भारतात परतल्यानंतरही शिक्षणात खंड पडणार नसल्याने याबाबतीत विद्यार्थी निर्धास्त आहेत. युक्रेनच्या सीमेजवळ युद्ध सुरू असल्याने तेथील विद्यार्थ्यांना लष्करी तळावर हलवण्यात आले आहे.

पुण्याचा आविष्कार मुळे चेर्नीवर्स शहरात शिक्षणासाठी गेला होता. त्याच्या राहत्या ठिकाणापासून ४० किमी अंतरावर रोमानिया विमानतळ होते. भारतीय दूतावासाच्या निर्देशानुसार चेर्नीवर्स शहरातील विद्यार्थी तासाभराचे अंतर पार करून रोमानियापर्यंत पोहोचले. तेथे स्थानिक रोमानी नागरिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना बरेच सहकार्य केले. त्यांना जेवण पुरवले, अशी माहिती आविष्कार याने दिली. भारतीय नागरिकांना घेण्यासाठी विमाने पोहोचली असली तरी स्थानिक युक्रेनी नागरिकांना कुणीही वाली उरलेला नाही. तेही इतरांप्रमाणे जीव वाचवण्यासाठी देशातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. विमानतळावर जमलेल्या युक्रेनी नागरिकांच्या गर्दीने तेथील रस्ते तुडुंब भरले असल्याचे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या