किल्ल्यात वेरुळपूर्व तीन जैन लेणी ; विकासाच्या अभ्यासकांना ठेवा उपलब्ध झाल्याचा दावा


काही स्तंभांवर उभ्या असणाऱ्या लेणींमध्ये चुन्याची काही नक्षी दिसते. तसेच दौलताबाद किल्ल्यांमधील खंदकांपर्यंत लेणीतून जाणारा एक भुयारी मार्ग आहे


औरंगाबाद : दौलताबादच्या किल्ल्यात यादवकालीन किंवा त्यापूर्व कालावधीतील तीन लेणी नव्याने सामोऱ्या आल्या आहेत. लेणीपर्यंत जाण्याचा मार्ग नसल्याने पर्यटकांना वर्षांनुवर्षे ही बाब माहीत नव्हती. गेल्यावर्षीच्या पावसात यातील काही भाग कोसळला. या लेणीमध्ये कोणतेही शिल्प नाही. काही स्तंभांवर उभ्या असणाऱ्या लेणींमध्ये चुन्याची काही नक्षी दिसते. तसेच दौलताबाद किल्ल्यांमधील खंदकांपर्यंत लेणीतून जाणारा एक भुयारी मार्ग आहे. लेणी विकासाचा टप्पा अभ्यासण्यासाठी या लेणींचा अभ्यासकांना अधिक उपयोग होईल, असे मत लेणींच्या अभ्यासक दुलारी कुरेशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

 बहुतांश लेणी शिल्प स्वतंत्रपणे उभ्या केलेल्या असतात. किल्ल्यांमध्ये लेणी असण्याचा हा प्रकार यादवकालीन की यादवपूर्वकालीन याविषयी इतिहासातही संभ्रम आहेत. लेणींमध्ये शिल्प नसल्याने दौलताबाद किल्ल्यातील लेणी वेरुळपूर्व असतील असा कयास असून त्याचे संदर्भ देताना इतिहास तज्ज्ञ दुलारी कुरेशी म्हणाले, ‘या लेणींचे दोन संदर्भ इतिहासात वाचावयास मिळतात. पण त्याचा कालावधी कोणताही असला तरी लेणींची स्थित्यंतर व विकास याच्या अभ्यासासाठी ही लेणी महत्त्वपूर्ण ठरते. वेरुळ शिल्पाचा विकास होण्यापूर्वी जैन लेणी कोरणाऱ्या कलावंतांनी या भागात काम केले असेल. त्यामुळे यादवपूर्व काळातही हे संदर्भ असू शकतात असेही वाचण्यात आले होते. पण दौलताबाद किल्ल्यातील या लेणी जैन लेणीच आहेत.’

दौलताबाद किल्ल्यातील राजवाडय़ाजवळील तीन लेणींभोवती एवढे दिवस गवत होते. दरवर्षी पुरातत्त्व विभागातून तेथे साफसफाई होई. पण लेणीकडे जाण्यासाठी वाट नव्हती. गेल्या वर्षी लेणी समोरील भाग कोसळला.

त्या शिळा आता किल्ल्याबाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून शिळा फोडून वाहतूक केली जात आहे. देवगिरी किल्ल्यातील हे काम पूर्ण झाल्यानंतर लेणीचे छत टिकून राहावे म्हणून काही स्तंभही उभे केले जाणार आहेत. तसेच हा भाग पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. लेणींमध्ये शिल्प नसल्याने सामान्य नागरिकांपेक्षा अभ्यासकांना या लेणीचा अधिक फायदा होऊ शकतो असे मानले जात आहे.

काही कमकुवत स्तंभावर पेलून धरलेल्या या लेणीमध्ये काही देवळय़ा व नक्षीकाम आहे. खंदकाकडे भुयारी मार्ग पाहणे पर्यटकांना आनंद देऊ शकेल. मात्र, तेथे पुरेशा सुविधा निर्माण करण्यावर पुरातत्त्व विभागाला लक्ष द्यावे लागणार आहे. वेरुळ येथील जैन लेणींचा विकसित शिल्प होण्यापूर्वी केलेले काम म्हणून या लेणीकडे पाहिले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या