आयकरचे पथक जाधवांच्या घरून परतले ; चौकशीत हाती काय लागले?


मुंबईः
शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी सुरु होती. सलग चार दिवसांपासून सुरू असलेली ही झडती अखेर संपली आहे. तब्बल ७२ तासांनंतर आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरातून बाहेर पडले आहेत. यशवंत जाधव हे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जातो. मात्र, यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी का केली गेली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या चार दिवसांच्या चौकशीत अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. जवळपास २५ तासांच्या चौकशीनंतर आज सकाळी ९. ३०च्या सुमारास अधिकारी जाधव यांच्या घरातून बाहेर पडले आहेत.

यशवंत जाधव यांच्यावर आरोप

यशवंत जाधव यांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल १५ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात आरोप केले होते. आयकर विभागाच्या नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून यशवंत जाधव यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे या चौकशीतून काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या