पश्चिम नद्यांचे पाणी नाशिककडे वळविण्यास मराठवाडय़ातून विरोध


राज्य जल आराखडय़ानुसार जायकवाडीच्या उध्र्व बाजूस म्हणजे नाशिक जिल्ह्यात ११५.५० टीएमसी पाणी मंजूर होते.

औरंगाबाद : पश्चिम वाहिनीतील नदीखोऱ्यातील म्हणजे कोकणातील समुद्रात वाहून जाणारे १६८.७५ घनफूट पाणी वळविण्याच्या योजनांना मंजुरी दिल्यानंतर दमणगंगा, वैतरणा खोऱ्यातून २०२ दशलक्ष घनमीटर पाणी सिन्नर तालुक्यात वळविण्याचा घाट घातला जात आहे. राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालात ही बाब नमूद करण्यात आलेली आहे. दमणगंगा खोऱ्यातील १४३ दलघमी पाणीही उध्र्व खोऱ्यातील वाघाड धरणात आणण्यात येणार असून तयार केलेला आराखडा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन असून त्यावर आक्षेप घेत सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती विभागीय आयुक्तांनीही राज्य सरकारला केली आहे.

राज्य जल आराखडय़ानुसार जायकवाडीच्या उध्र्व बाजूस म्हणजे नाशिक जिल्ह्यात ११५.५० टीएमसी पाणी मंजूर होते. पण या जिल्ह्यात १५१ अब्ज घनफूट पाण्याची धरणे बांधण्यात आली. ३५.५० अब्ज घनफुट पाणी अधिकचे वापरूनही नव्याने पाणी वळविण्याच्या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना त्याचा लाभ सिन्नर तालुक्याला होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. त्याला मराठवाडय़ातून विरोध केला जात आहे. या प्रश्नी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी अधिक लक्ष घालावे, अशी विनंती करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेही पाणी वळविण्याच्या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून त्यांनी या प्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती शंकर नागरे यांनी अलिकडेच केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पाचे सुतोवाच करण्यात आलेले आहे. राज्य सरकारनेही नदीजोड प्रकल्पाच्या सविस्तर सर्वेक्षणाचे काम राज्य प्रकल्प म्हणून हाती घेतले होते. त्यासाठी लागणारा निधी राज्यपालांच्या सुत्राबाहेर ठेवण्याची विनंती केली जात आहे. उल्हास, वैतरणा, नार-पार व दमणगंगा उपखोऱ्यातून २९ योजनांच्या सहाय्याने १६८ अब्ज घनफुट पाणी आणण्याची योजना आहे. नदीजोड प्रकल्पाचे नाशिक येथील कार्यालय समन्वयासाठी म्हणून औरंगाबाद येथे आणावे, अशीही मागणी नोंदविण्यात आली होती. मात्र, त्यास जलसंपदामंत्री जयंत पाटील अनुकूल नव्हते. राष्ट्रीय जलविकास अधिकरण व महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार दमणगंगा खोऱ्यातून पाणी वळविण्याच्या दोन नदीजोड योजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल मराठवाडय़ावर अन्याय करणारा ठरू शकेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

दमणगंगा व वैतरणा खोऱ्यातील २०२ दशलक्ष घनमीटर पाणी म्हणजे ७.१३ अब्ज घनफुट पाणी उध्र्व खोऱ्यातील देवनदीमध्ये सोडण्यात येणार आहे. दमणगंगा खोऱ्यातील नीलमती आणि घाटकरपाडा तसेच वैतरणा खोऱ्यातील कोशिमशेत (पुलाची वाडी आणि बेडुकपाडा) आणि उधाळे या चार ठिकाणी पाणीसाठा निर्माण करून तो वैतरणा व कडबा धरणात आणून पुढे देवनदीमध्ये उपसा सिंचन योजनेद्वारे सोडावे व त्याचा लाभ नाशिकमधील डीएमआयसी आणि सिन्नर तालुक्यातील ११ हजार ४८० हेक्टर सिंचनासाठी केला जावा, असे प्रस्तावित आहे. मूलत: उपसा सिंचन योजना परवडणाऱ्या नाही आणि त्या यापुढे अति घेतल्या जाऊ नये, अशी शिफारस चितळे आयोगाने राज्य सरकारला केलेली होती. स्वत:च घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना मुरड घालून पाणी वळविण्याचा घाट घातला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या