टेम्पोला लागलेल्या आगीत पुणे बोर्डाच्या १२ वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

 


 घारगाव : 

पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात आज बुधवारी (२३ फेब्रवारी) पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या. दुर्घटनेत प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या असून या प्रश्नपत्रिका बारावीच्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे बोर्डाला याची माहिती कळवण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला जाणार आहे. त्यानंतर या नेमक्या कोणत्या प्रश्नपत्रिका होत्या, हे स्पष्ट होईल, असं घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितलं आहे.

याबबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादसमोर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टेम्पोने (क्रमांक एम. पी. ३६ एच. ०७९५) पाठीमागील बाजूने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवला. चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत यांनी ही आग अटोक्यात आणण्याचं काम सुरू केलं. आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, महामार्ग पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, अंमलदार कैलास देशमुख घटनास्थळी गेले. संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग अटोक्यात आणली. महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्घटनेनंतर नाशिक-पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून वळवण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुणे बोर्डचे अधिकारी काही वेळात घटनास्थळी दाखल होणार आहेत

 घटना नेमकी घडली कशी?
पेपरफुटी टाळण्यासाठी आणि गोपनीयता म्हणून प्रश्नपत्रिका छापाईचे काम महाराष्ट्राऐवजी बाहेरच्या राज्यात देण्यात आले होते. बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. त्यासाठी या प्रश्नपत्रिका आणल्या जात होत्या. हे वाहन नगर जिल्ह्यात आल्यावर पहाटेच्या सुमारास आग लागली. आग कशी लागली, याचे कारण अद्याप पुढे आलेलं नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ती लागली असावी, असे चालक-वाहक सांगत आहेत. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन तसंच या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असे अनेक वाद सुरू आहेत. मात्र, परीक्षा ऑफलाइन आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्यावर परीक्षा विभाग ठाम आहे. अशातच ही घटना घडली आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रश्नपित्रका वेळेत छापून आणण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या