श्रेयसची हॅटट्रिक आणि भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड ; तिसऱ्या टी-२०सह मालिका ३-०ने जिंकली


भारताने श्रीलंकेविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकली

धर्मशाला: श्रेयस अय्यरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा तिसऱ्या टी-२० सामन्यात ६ विकेटनी सहज विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १४७ धावांचे आव्हान दिले होते. भारताने विजयाचे लक्ष्य १६.५ षटकात पार केले. भारताचा टी-२० मधील हा सलग १२वा विजय ठरला. टीम इंडियाने टी-२०मधील सलग विजयाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.

तिसऱ्या टी-२० लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या षटकात ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरने सलामीवीर संजू सॅमसनसह ४५ धावांची भागिदारी केली. संजू १२ चेंडूत १८ धावा करून माघारी गेला. त्याच्या जागी आलेल्या दीपक हुड्डाने श्रेयससह संघाला शतकाच्या जवळ नेले. ही जोडी विजय मिळवून देईल असे वाटत असताना दीपक २१ धावांवर बाद झाला. तर वेंकटेश अय्यर देखील ५ धावांवर परतला. वेंकटेश बाद झाला तेव्हा भारताने १०३ धावा केल्या होत्या.

मैदानावर आलेल्या रविंद्र जडेजाने श्रेयससह पाचव्या विकेटसाठी नाबाद भागिदारी करून संघाला १७व्या षटकात विजय मिळवून दिला. श्रेयसने ४५ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ७३ तर रविंद्र जडेजाने १५ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या. श्रेयसने या मालिकेत सलग ३ अर्धशतक केली. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद ५७, दुसऱ्या सामन्यात नाबाद ७४ तर तिसऱ्या सामन्यात नाबाद ७३ धावा केल्या.

भारताचा हा आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये सलग १२वा विजय ठरला. त्यांनी आफगाणिस्तानच्या सलग १२ या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. त्याआधी तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. मोहम्मद सिराजने पहिल्या षटकाच्या ६व्या चेंडूवर लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर दुसऱ्या षटकात आवेश खानने पाचव्या चेंडूवर विकेट घेतली. पुन्हा चौथ्या षटाकत आवेशने लंकेला तिसरा धक्का दिला. यामुळे लंकेची अवस्था ३ बाद ११ अशी झाली. एका पाठोपाठ एक विकेट पडल्याने लंकेच्या धावांचा वेग कमी झाला. नव्या षटकात रवी बिश्नोईने लंकेला चौथा धक्का दिला. तर १३व्या षटकात हर्षल पटेलने दिनेश चंडिमलला बाद करून लंकेच्या पाचव्या फलंदाजाला माघारी पाठवले. यामुळे त्याची अवस्था १२.१ षटकात ५ बाद ६० अशी झाली होती.

श्रीलंकेचा संघ १०० जवळ देखील पोहोचणार नाही असे वाटत असताना कर्णधार दासुन शनाकाने सूत्रे हाती घेती. त्याने चमिका करुणारत्ने सोबत सहाव्या विकेटसाठी नाबाद ८६ धावांची भागिदारी केली. दासुनने ३८ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांसह नाबाद ७४ धावा केल्या. तर करुणारत्ने त्याला सुरेख साथ दिली.त्याने १९ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या. या दोघांच्या भागिदारीमुळे श्रीलंकेला समाधानकारक धावसंख्या उभी करता आली. भारताकडून आवेश खानने २ तर सिराज, हर्षल आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या