इशान किशनपाठोपाठ स्मृती मानधनाच्याही डोक्यावर बॉल आदळला! रिटायर्ड हर्ट होऊन माघारी


 भारत आणि दक्षिण आफ्रिका  यांच्यात महिला विश्वचषक 2022 मधील रविवारी (27 फेब्रुवारी) सराव सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिच्या डोक्याला दुखापत  झाली.

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका  यांच्यात महिला विश्वचषक 2022 मधील रविवारी (27 फेब्रुवारी) सराव सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिच्या डोक्याला दुखापत झाली. यामुळे तिला मैदान सोडावे लागले. रंगियोरा येथील सामन्याच्या सुरुवातीलाच एक वेगवान चेंडू स्मृतीच्या हेल्मेटवर लागला, त्यामुळे तिला ‘रिटायर्ड हर्ट‘ होऊन पव्हेलियनमध्ये परतावे लागले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वेबसाईटवरील रिपोर्टनुसार, स्मृती मानधनाला दक्षिण आफ्रिकेची फास्ट बॉलर शबनीम इस्माईलच्या बाऊन्सरमुळे दुखापत झाली होती. दुखापतीनंतर ती अस्वस्थ दिसत होती.


25 वर्षीय मानधनाची भारतीय संघाच्या डॉक्टरांनी तपासणी केली आणि सुरुवातीला ती खेळ सुरू ठेवण्यासाठी योग्य वाटली पण पुन्हा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तिने एका षटकानंतर ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन पव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू झाल्यानंतरही ती क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आली नव्हती.


स्मृती मानधना महत्त्वाची प्लेअर

स्मृती भारतीय संघाची महत्त्वाची सदस्य आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकात ती महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. स्मृती मानधना ही महिला एकदिवसीय क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील फलंदाज आहे. तिने 64 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41.71 च्या सरासरीने 2461 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात स्मृतीने 84 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी साकारली होती. यजमान न्यूझीलंडने ही मालिका 4-1 अशी जिंकली होती.


स्मृती मानधनाचा हा दुसरा महिला विश्वचषक असेल. ती भारताच्या वरिष्ठ फलंदाजांपैकी एक आहे. सलामीला तिच्याकडून टीम इंडियाला खूप आशा आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ती नसताना संघाच्या संयोजनावरही परिणाम झाला. अशा स्थितीत विश्वचषकात ती पूर्णपणे फिट असणं आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या