बाबाकडे गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

कुणीतरी करणी केली म्हणून गेल्या एक महिन्यापासून भोंदू बाबाकडे उपचार घेणाऱ्या एका महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बालानगर परिसरात घडली आहे.


औरंगाबाद : कुणीतरी करणी केली म्हणून गेल्या एक महिन्यापासून भोंदू बाबाकडे उपचार घेणाऱ्या एका महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बालानगर परिसरात घडली आहे. तर जरीनखान मुख्तारखान पठाण (रा. बायजीपूरा गल्ली नंबर २१) असं मयत महिलेचं नाव आहे. अधिक माहिती अशी की, जरीन खान यांची नेहमी प्रकृती खराब राहत असल्याने त्यांच्या कुटुंबाकडून वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखवण्यात आले. मात्र तरीही काहीच फरक पडत नव्हता. दरम्यान बालानगर येथील एका शेतात राहणाऱ्या बाबा आशा रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जरीन खान यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना या बाबाकडे उपचारासाठी घेऊन आले. पण काही दिवस इथेच राहून उपचार करावा लागणार असल्याचं बाबाकडून सांगण्यात आले. पण जरीनखान ह्या भोळसर असल्याने घरातील दोन सदस्य गेली एक महिना बालानगरमध्येच राहून बाबाकडे उपचार घेत होत्या.

उपचार सुरु असतानाच शुक्रवारी ( ११ फेब्रुवारी ) रोजी मध्यरात्री कुणालाही काहीही न सांगता जरीनखान बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या घरातील सदस्यांनी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यामुळे पोलिसांनी बेपत्ता महिलेचा शोध सुरू केला असता, शनिवारी बाबा राहत असलेल्या परिसरातील एका विहिरीत जरीनखान यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने महिलेचे मृतदेह विहिरी बाहेर काढून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जरीन खान यांचा मृतदेह जेव्हा जेव्हा विहिरीतून बाहेर काढले तेव्हा त्यांच्या पायात बेड्या बांधल्या होत्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. तर त्यांच्यावर कुणीतरी करणी केली म्हणून बाबा उपचार करत असल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे नेमकं काय प्रकरण आहे हे सर्व पोलीस तपासातच स्पष्ट होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या