सराफाचं दुकान लुटलं, स्कुटीच्या डिकीतून सोनं घेऊन पसार, CCTV मध्ये रेकॉर्ड !


चोरट्यांनी भरदिवसा बीडच्या अंबाजोगाई येथील सराफा व्यापारी राहुल राठोड यांचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने डिकीत ठेवलेली स्कुटी घेऊन पोबारा केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती.

बीड : चोरट्यांनी भरदिवसा बीडच्या अंबाजोगाई येथील सराफा व्यापारी राहुल राठोड यांचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने डिकीत ठेवलेली स्कुटी घेऊन पोबारा केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. स्कुटी घेऊन चोरटे आंबेजोगाई शहरातील मोंढा राजस्थानी मंगल कार्यालयाच्या पाठीमागून जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. सदरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले असताना देखील अद्याप पर्यंत पोलिसांना चोरट्याला ताब्यात घेता आले नसल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अण्णांना कसली घाई? 'फास्ट ट्रॅक' आंदोलनामुळे सर्वांनाच पडला प्रश्न

अंबाजोगाई शहरातील सराफा व्यापारी राहुल राठोड यांचे गुरुवार पेठेत सोन्या-चांदीचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी शटरच्या कुलुपात फेवीक्विक आणि वाळू टाकली. सकाळी राठोड नेहमीप्रमाणे स्कुटीच्या डिकीत सोन्याचे दागिने घेऊन दुकानाकडे आले. परंतु, कुलूप उघडत नसल्याने ते स्कुटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चावीवाल्याकडे गेले. यावेळी ते चावी वाल्यासोबत बोलत असताना चोरट्यांनी त्यांची स्कुटी घेऊन पोबारा केला. त्या स्कुटीच्या डिकीत लाखो रुपयांचे दागिने होते. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.

मात्र दिवसाढवळ्या चोरांचं इतकं मोठं धाडस होतंच कसं? पोलिस यंत्रणा झोपेत आहे की काय? असे सवाल नागरिक विचारत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यात एक ना अनेक घटना घडलेला पाहायला मिळत आहेत, तरी पोलीस प्रशासन थंडगार का? असा सवाल जनतेतून पुढे येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या