औरंगाबाद शहरातील ‘किले अर्क’ परिसरातील तटबंदीची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी एक कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील ‘किले अर्क’ परिसरातील तटबंदीची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी एक कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ऐतिहासिक तटबंदीचे शहर व त्या भोवतालची जागा खुला रंगमंच किंवा सभा-संमेलनासाठी वापरता येणे शक्य असल्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, शहर अभयंता सखाराम पानझडे यांची या वेळी उपस्थिती होती.
तटबंदीच्या शहरांचा इतिहास मोठा जुना आहे. ‘भारताची कुळकथा’ या मधुकर ढवळीकर यांच्या पुस्तकात पुराचा धोका असणाऱ्या शहरास तटबंदी बांधण्याचा प्रघात होता असे म्हटले आहे. तटबंदी असणाऱ्या गावातील वस्त्यांची नावे पुरा या अंत्याक्षराने उच्चारण्याची पद्धतही खूप पुरातन आहे. पुरातत्त्वीय अभ्यासातही ही बाब पुढे आली होती. मात्र, औरंगाबाद शहरातील तटबंदीचा संदर्भ राजाचे संरक्षण असा होता. त्याचा आणि पुराच्या पाण्याचा संबंध नाही.
किले अर्क मधील अर्क हा शब्द पर्शियन १८७७ मधील गॅझेटमध्ये दिलेल्या वर्णनानुसार येथे राजाचा निवास असून तेथेच तो बसायचा म्हणून कले अर्क व किले तक्त ही महत्त्वाची ठिकाणे होती. त्यामुळे तेथे औरंगजेबाने तटबंदी उभी केली असे इतिहासतज्ज्ञ रा. श्री. मोरवंचीकर यांनी सांगितले. या तटबंदीची, त्याची दुरुस्ती केल्यानंतर ही जागा विविध कामासाठी वापरता येऊ शकेल असे सांगण्यात येत आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन समितीचे वास्तूविशारद प्रदीप देशपांडे म्हणाले, या तटबंदीच्या वर असणाऱ्या विटाची कमान दुरुस्त करून त्याचा गिलावा करण्याचे काम करताना त्याचे पुरातन सौंदर्य उजळून निघावे असे प्रयत्न केले जाणार आहेत. लातूर येथील साईप्रेम कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने हे काम केले जाणार आहे.
0 टिप्पण्या