दुसऱ्या कसोटीसाठी सिराज आणि अक्षर पटेलपैकी कुणाला मिळणार संधी, बुमराने स्पष्टचं सांगितलं...

 


मुंबई :
भारताने आपल्या भूमीवर आतापर्यंत एकूण दोन दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत आणि दोन्हीमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पहिला डे-नाईट कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध आणि दुसरा इंग्लंडविरुद्ध खेळला होता आणि दोन्हीमध्ये मोठा विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत आता त्यांच्या भूमीवर तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार असून साहजिकच संघाला आपली विजयी मोहीम सुरू ठेवायची आहे.

शनिवारपासून (१२ मार्च) बंगळुरूमध्ये खेळल्या जाणार्‍या दिवस-रात्र कसोटी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंची निवड महत्त्वाची ठरणार आहे. त्यात फारसा बदल दिसणार नसला तरी, जयंत यादवला वगळले जाऊ शकते. कारण अक्षर पटेल संघात परतला आहे, जो फिरकी गोलंदाजीसह चांगली फलंदाजीही करतो. जयंतच्या जागी संघात अक्षर पटेलसह मोहम्मद सिराज देखील येऊ शकतो, ज्यांच्यासाठी बंगळुरू हे घरचे मैदान आहे, कारण त्याने या मैदानावर आरसीबीसाठी बरेच सामने खेळले आहेत आणि त्याला येथे खेळण्याचा खूप अनुभव आहे.


बंगळुरूमध्ये पहिले तीन दिवस फलंदाजांना मदत मिळते, तर शेवटचे दोन दिवस फिरकीपटूंना खेळपट्टीची मदत मिळते आणि ही परंपरा आताही सुरू राहण्याची अपेक्षा आहे. बंगळुरूमधील खेळपट्टी लाल मातीची बनलेली आहे आणि एकदा खेळपट्टीला तडे गेल्यावर पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. तेथील तापमान ३० अंशांच्या आसपास असेल आणि अशा परिस्थितीत तडे लवकर पडू शकतात. इतकंच नाही तर सामना दिवस-रात्र असल्याने संध्याकाळच्या सुमारास बंगळुरूमध्ये वारा वाहतो, त्यामुळे वेगवान गोलंदाजाना चेंडू स्विंग करण्यास मदत होईल.


अक्षर पटेलने अहमदाबादमध्ये लाल मातीवर आपल्या गोलंदाजीचा फायदा करून घेतला, पण बंगळुरूमध्ये परिस्थिती वेगळी असू शकते. येथे सिराजला फायदा मिळू शकतो, कारण त्याला येथे खेळण्याचा भरपूर अनुभव आहे आणि तेथील परिस्थितीही त्याला अक्षरपेक्षा चांगली समजते. कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने या दोघांपैकी कोणाला अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकेल, यावर बोलणे टाळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या