सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

 


अहमदनगरः
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव गेणूजी कोल्हे (वय ९४) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी साडेचार वाजता कोपरगावमध्ये संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोपरगाव तालुक्यातील येसगांव सारख्या छोट्याशा खेडेगावातून ग्रामीण जीवनाचा बाज अंगी बाळगत कोल्हे यांनी धाडसानं सर्वच क्षेत्रात काम केले. कोल्हे यांनी दीर्घकाळ कोपरगावचे प्रतिनिधीत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरवातीच्या काळापासून काम केले. अलीकडे ते राज्याच्या सक्रीय राजकारणापासून अलिप्त झाले होते. मात्र, त्यांची सून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून गेल्या सरकारच्या काळात कोपरगावचे प्रतिनिधीत्व केल्याने कोल्हे घराण्याचा भाजपशी संबंध आला.

कोल्हे यांचे सहकारातील योगदान मोठे आहे. १९६० मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आणि सक्षमपणे चालविल्या. शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता ते सहा वेळा ते कोपरगावचे आमदार होते. या काळात महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. बी. एस्सी. अ‍ॅग्रिकल्चरची पदवी संपादन केलेले कोल्हे यांचे शेती, सहकार, पाणी, साखर, जागतिकीकरण अशा विविध क्षेत्रात मोठा कार्य आहे. येसगावचे सरपंच ते मंत्री आणि इतरही अनेक महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मजल मारली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले. विविध विषयांवरील त्यांची पुस्तकेही आहेत. विविध क्षेत्रातील अभ्यासासाठी त्यांनी परदेश दौरे केले.

तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी त्यांचा सतत संघर्ष सुरू होता. तर दुसरीकडे तालुक्यातील दिवंगत नेते शंकरराव काळे यांच्याशीही त्यांचा राजकीय संघर्ष सुरू होता. पाणी प्रश्नाला प्राधान्य देत कोल्हे यांनी २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. तालुक्यात काळे-कोल्हे यांच्यात राजकीय संघर्ष राज्यभर गाजत असला तरी विकासाच्या मुद्द्यावर दोघेही एकत्र येऊन काम करीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या