ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी महात्मा गांधींची तसबीर काढून केबिनमध्ये दाऊदचा फोटो लावावा: नितेश राणे


 मुंबई:
ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी आता त्यांच्या केबिनमधील महात्मा गांधीजींची तसबीर काढून त्याठिकाणी दाऊद इब्राहिमचा फोटो लावावा. एवढंच कशाला राज्य सरकारने दाऊदला महाराष्ट्र भूषण पुरस्कारही देऊन टाकावा, अशी खोचक टिप्पणी भाजप आमदार नितेश राणे  यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव दाऊदशी जोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून नितेश राणे आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी नितेश राणे यांनी म्हटले की, आमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला आहे, आम्ही काही चुकीचं बोललो का? आमची भाषा दंगलीला चिथावणी देणार नव्हती तर आम्ही हिंदुत्वाची बाजू घेऊन बोललो. नवाब मलिक मुस्लीम कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचं नाव दाऊदशी जोडलं जातं, असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यावर मी एवढंच विचारलं की, मग तुम्ही अनिल देशमुख यांचा राजीनामा ते हिंदू असल्यामुळे घेतला का? आम्ही केवळ हिंदुत्वाची बाजू घेतली. देशात हिंदू-मुस्लीम दंगल होऊ नये, ही आमचीही भूमिका आहे. त्यामुळे आमचा दंगल भडकवण्याचा उद्देश नव्हता. परंतु, आम्ही हिंदूंवर अन्याय होऊन देणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले.

यावेळी नितेश राणे यांनी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना टोलाही लगावला. नवाब मलिक यांनी दाऊदशी आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावे आहेत. तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. त्यामुळे आता महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आपापल्या केबिनमध्ये महात्मा गांधींजी यांच्याऐवजी दाऊदचा फोटो लावावा, असे नितेश यांनी म्हटले. तसेच पोलिसांच्या नोटीसला मी जे काय उत्तर द्यायचं आहे, ते देईन. अलीकडे आम्हाला रोज सकाळी नोटीस येण्याची सवयच लागली आहे. महाराष्ट्रात सत्य बोलणे गुन्हाच झाला आहे, असेही नितेश राणे यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या