पूर्वी फक्त भूमिपूजन, आता प्रकल्पपूर्तीही ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका


पुणे :
याआधी प्रकल्पांचे भूमिपूजन व्हायचे, पण उद्घाटन केव्हा होणार, हे अनिश्चित असायच़े  आता मात्र प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत, हा संदेश पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे जनतेत पोहोचला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस राजवटीवर नाव न घेता टीका केली. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी पीएम गती-शक्ती राष्ट्रीय बृहत् आराखडा केंद्र सरकारने तयार केल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुणे महापालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळय़ाचे अनावरण, मुळा-मुठा नदी सुधार आणि मुळा-मुठा नदीकाठ पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन तसेच विजेवर धावणाऱ्या (ई-बस) १४० गाडय़ांचे आणि ई-बस आगाराचे लोकार्पण, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. गरवारे महाविद्यालय स्थानकापासून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मोदी यांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ िशदे, विधानसभेतील विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या महापौर माई ढोरे या वेळी उपस्थित होते.

स्मृती मानधनाचा ‘हा’ एकदा बघाच; पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया

‘‘पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गती आवश्यक आहे. गेल्या काही दशकांत देशात योजना जाहीर झाल्या़ मात्र त्या पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागला. ही संथगती विकासाला मारक ठरली. दोन शासकीय विभागांतील समन्वयाचा अभाव यापूर्वी दिसून येत होता. आता गती आणि प्रकल्प पूर्ण करण्याच्या कालावधीकडे लक्ष दिले जात आहे. त्यासाठी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखडा उपयुक्त ठरला, असे मोदी यांनी सांगितले.

दरम्यान, मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुंबई-द्रुतगती महामार्गाची एक मार्गिका बंद करण्यात आली होती. कार्यक्रम संपल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार द्रुतगती मार्गाने मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्या वाहनांचा ताफा द्रुतगती मार्गावर आल्याने सोयीसाठी एक मार्गिका टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत होती. तसेच ताफा गेल्यानंतर मार्गिका टप्प्याप्प्प्याने सुरू करण्यात आली, असे महामार्ग पोलिसांनी सांगितल़े मात्र, रविवार असल्याने मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, असे सांगण्यात आले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान भाजप नेते करत असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आले. काळे कपडे परिधान करून घोषणाबाजी करण्यात आली. सुरक्षेचा अतिरेक कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. काळे कपडे, गॉगल, पायमोजे, काळे शर्ट परिधान करणाऱ्यांना ते काढून टाकण्यास भाग पाडण्यात आले. कपडय़ांची तसेच वस्तूंची तपासणी केल्यानंतरच त्यांना सभास्थानी प्रवेश देण्यात आला. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मोदी यांच्या दौऱ्यामुळे शहरातील जंगली महाराज रस्त्यासह कर्वे रस्ता दुपापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रस्त्यावरील दुकानेही बंद करण्यात आली होती. मोदी हे शहराबाहेर पडल्यानंतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली.

युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची मोहीम हा जगातील भारताच्या वाढत्या प्रभावाचा पुरावा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुण्यात केले. ऑपरेशन गंगाबद्दल मोदी म्हणाले, की अन्य देशांना त्यांच्या नागरिकांची सुटका करणे कठीण जात असताना आम्ही आमच्या नागरिकांना तेथून बाहेर काढण्यात यशस्वी झालो. यावरून जगात भारताचा वाढता प्रभाव सिद्ध होतो. 

अलीकडे महत्त्वाच्या पदावरील सन्माननीय व्यक्ती अनावश्यक वक्तव्ये करीत आहेत. ती महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीस पटणारी नाहीत, ही बाब मी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल पंतप्रधानांकडे जाहीर नाराजी व्यक्त केली. राज्यपाल कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्याचे तीव्र पडसादही उमटले होते.  ‘‘छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा, सत्यशोधनाचा पाया रचला. त्यांचा वारसा घेऊन आपल्याला राज्याला पुढे घेऊन जायचे आहे’’, असे पवार म्हणाले. मेट्रोच्या श्रेयवादावरूनही त्यांनी टीका केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या