श्रीरामपूर एमआयडीसीत रंगाच्या कंपनीला भीषण आग


कोट्यवधींची हानीः कारण गुलदस्त्यात

श्रीरामपूरः श्रीरामपूर एमआयडीसीतील सरफेस कोटिंग या रंग बनविणार्‍या कंपनीला भीषण आग लागल्याने कोट्यवधी रुपयांची हानी झाली. आज सोमवारी सकाळी 11 वाजेदरम्यान लागलेली ही आग तब्बल साडेतीन तास दुपारी 2ः 30 वाजेपर्यंत धुमसत होती. ऐन उन्हाच्या तडाख्यात ही आग लागली. आगीचे लोळ उडाल्याने आकाशात धुराचे साम्राज्य पसरले होते. मध्येच दोन स्फोट झाल्याने काहीसे भितीचे वातावरण पसरले होते. प्लॉट क्रमांक सी 89 मध्ये हा प्लँट रस्त्याच्याकडेला स्वतंत्र असल्याने इतर प्लँटला या आगीची झळ पोहचली नाही. या आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही, परंतु कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. 

नुकसानग्रस्त कंपनीचे मालक कृष्णा यादव असून, ते मुंबईला राहतात. दरम्यान, दुर्घटनास्थळी ते उपस्थित होते. 

 या आगीची माहिती मिळताच डिवायएसपी संदीप मिटके, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटिल, पो. नि. संजय सानप, न. पा. मुख्याधिकारी गणेश शिंदे, एम. आय. डि. सी.चे चेअरमन बाबासाहेब काळे, श्रीरामपूरचे तलाठी राजेंद्र घोरपडे यांनी प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेवून या अग्नितांडवावर नियंत्रण मिळविण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले. ऐन उन्हाच्या तडाख्यात हवेचा वेग वाढल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दुर्घटनाग्रस्त कारखान्यात तीन कर्मचारी उपस्थित होते. या कारखान्याचा विमा उतरविलेला नसल्याचे कारखान्याचे मालक कृष्णा यादव यांच्याकडून सांगण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या