अवकाळीची अवकृपा सुरुच

 शेतीमाल बाजारपेठत तरीही नुकसान अटळच


पुणे :
अवकाळी पावसामुळे आतापर्यंत शेतामध्ये उभ्या पिकाला धोका निर्माण होता. मात्र, अवकाळीचा मुक्काम राज्यातील विविध भागामध्ये वाढत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान सुरुच असून आता बाजारपेठेत दाखल झालेल्या शेतीमालाला देखील फटका बसत आहे. पुणे जिल्ह्याच्या चाकण परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार चाकण येथे विक्रीसाठी आणलेला  कांदा, बटाटा भिजला आहे. त्यामुळे या भिजलेल्या शेतीमालाला कमी बाजार भाव मिळणार असल्याने बळीराजा हतबल आहे. भाजीपाल्यातून उत्पन्न मिळेल या आशेने शेतकरी भल्या पहाटेच माल घेऊन बाजारपेठेत दाखल होतो. मात्र, येथेही निवारा नसल्याने शनिवारी पहाटे झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे.


उन्हाळी हंगामातील कांदा बाजारात

सध्या लाल कांद्याची आवक कमी झाली असली तर उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली आहे. उन्हाळी हंगामातील कांद्याला थेट पावसाचा फटका बसत आहे. गेल्या तीन दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण आणि शनिवारी पहाटे बरसलेल्या सरी यामुळे शेतीमालाचे नुकसान झाले आहे. नेहमीप्रमाणे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भल्या पहाटे कांद्यासह भाजीपाल्याची आवक झाली होती. पण सौदे होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली असल्याने भाजीपाल्याचे नुकसान तर झालेच पण ज्या ठिकाणी पाणी साचले तेथील कांदा सडण्याची भीती आहे


म्हणून आवक वाढतेय..

शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला लाल कांदा आता संपलेला आहे. शिवाय उन्हाळी कांद्याचेही दर दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी आहे तो माल विकण्यावर भर देत आहे. यातच ढगाळ वातावरणामुळे कांदा साठवूण ठेवण्यापेक्षा मिळेल त्या दरात विकण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शवली आहे. सध्या 1 हजार ते 1900 पर्यंत कांद्याला दर मिळत आहे. भविष्यात आवक वाढली तर यामध्ये अणखी घट होईल या धास्तीनेच आवक वाढत आहे.


सोलापुरात आवक घटली

लासलगाव पाठोपाठ सोलापूर येथे कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील कांदा याच बाजार समितीमध्ये दाखल होतो. मात्र, शुक्रवारी बाजार समितीच्या परिसरात दाखल झालेला कांदा पावसाने भिजला. परिणामी दरात तर घसरण झालीच पण काही खराब माल व्यापाऱ्यांनी घेतला नाही. शिवाय शनिवारी ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झालेल्या कांद्याची साठवणूक करणेच पसंत केले आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये आवक घटलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या